नागपूर : उत्साह, आनंद आणि कुतुहल...माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यानंतर प्रथमच मोदींचे भाषण ऐकण्याची मुलांची इच्छा होती. पंतप्रधान खास विद्यार्थ्यांशी संवाद साधणार म्हणून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. आज शिक्षकदिन असल्याने शाळेत उत्सवाचे वातावरण होते. त्यात पंतप्रधानांचे भाषण ऐकता यावे म्हणून शाळांतर्फे टी.व्ही, ध्वनियंत्रणा आदींची खास सोय करण्यात आली होती. त्यामुळे मोदींच्या भाषणापूर्वीच वातावरणनिर्मिती अनेक शाळांत झाली होती. विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या भाषणाची उत्सुकता होतीच. कार्यक्रम सुरू झाल्यावरच अनेक शाळांतील विद्यार्थ्यांनी ‘लाईव्ह’ कार्यक्रमासारख्या टाळ्या वाजविल्या अन् मोदींचा क्लास सुरू झाला. नरेंद्र मोदी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात नागपूरचा उल्लेख केल्यावर तर सारेच विद्यार्थी या कार्यक्रमाशी अधिक जुळले. जवळपास सर्वच शाळांत मोदींचे भाषण ऐकता यावे म्हणून टी.व्ही. संच उपलब्ध करण्यात आला. तर काही शाळांनी रेडिओच्या माध्यमातून हा संवाद ऐकण्याची सोय केली होती. पण काही शाळांतील वीज गेल्याने तर काही शाळांत ध्वनिक्षेपकावर योग्य आवाज येत नसल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोडही झाला. एकूणच सर्व शाळांमध्ये या संवादासाठी उत्साह होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा क्लास नागपुरातही ‘हाऊसफुल्ल’ झाला.
पी.एम.चा क्लास हाऊसफुल्ल
By admin | Updated: September 6, 2014 03:01 IST