दहा लाखांचा गंडा : महिलेसह तिघांवर गुन्हे दाखलनागपूर : भूखंडाची बनावट कागदपत्रे तयार करून एकाला दहा लाखांचा गंडा घालणाऱ्या तिघांविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हे दाखल केले. महेंद्र भाऊराव महेशकर, सुनील काशीनाथ मेश्राम (दोघेही रा. आवळेनगर, टेकानाका) आणि लिला सुरेश मेश्राम (रा. इंदोरा बाळकृष्णनगर) अशी आरोपींची नावे आहेत.दाभा (गिट्टीखदान) येथील गुडलक सोसायटीत किरण मल्लिकार्जुन फालके यांचा एक भूखंड आहे. त्याची उपरोक्त आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार केली. लिला मेश्रामने तर स्वत:च्या नावाचे बनावट मतदान ओळखपत्रही तयार केले. त्यानंतर या तिघांनी मिळून महेंद्र महेशकरच्या नावाने भूखंडाची विक्री करून घेतली. अशाप्रकारे महेशकर फालकेंच्या भूखंडाचा मालक बनला. २००८ मध्ये त्यांनी या भूखंडाच्या विक्रीचा सौदा जयंता वामनराव गुल्हाणे (वय ५२, रा. कोलबास्वामी कॉलनी) आणि अर्जुन उत्तमदास दासवानी या दोघांसोबत केला. त्यांच्याकडून आरोपींनी १० लाख, १२ हजार, ७०० रुपये घेतले. आरोपी विक्रीसाठी टाळाटाळ करीत असल्यामुळे गुल्हाणे आणि दासवानींना संशय आला. त्यांनी मूळ कागदपत्रे तपासली असता ही बनवाबनवी उघड झाली.गुल्हाणे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले. आरोपींचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)
बनावट कागदपत्रे तयार करून भूखंडाचा सौदा
By admin | Updated: June 26, 2014 00:55 IST