राष्ट्रव्यापी जनआंदोलन : आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाने वेधले लक्ष नागपूर : देशाचा अर्थसंकल्प हा केवळ भांडवलदार वर्गाला लाभ पोहचवण्याच्या उद्देशाने तयार केला जात असल्याचे चित्र आजवर दिसून आले आहे. अर्थसंकल्प हा सामाजिक, मानवीय आणि आर्थिक विकासासाठी असावा. त्यातून केवळ भांडवलदारांचेच नव्हे तर देशातील सामान्यजनांच्या विकासाचे नियोजन असावे, यासंदर्भात आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाने राष्ट्रव्यापी जनआंदोलन छेडले आहे. गुरुवारी झाशी राणी चौकात आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियातर्फे या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. ‘विकास समता आणि न्यायासाठी २०१५-१६ चा अर्थसंकल्प कसा असावा’, याकडे लक्ष वेधण्यात आले. अर्थसंकल्प कसा असावा, यासंबंधात केंद्र सरकारकडे यासंबंधातील एक निवेदन सादर करण्यात आले आहे. आजवरचे अर्थसंकल्प पाहिले असता केवळ भांडवलदारांच्याच हिताकडे अधिक लक्ष देण्यात आले असल्याचे दिसून येते. त्यामुळे गरीब व श्रीमंतांमधील दरी वाढत गेली. महागाई, बेरोजगारी अशा अनेक समस्या निर्माण झाल्या. देशाला खऱ्या अर्थाने विकसित राष्ट्र करायचे असेल तर आगामी अर्थसंकल्पामध्ये सामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठरवून नियोजन करावे, असे आवाहन आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय (एपीआय) अध्यक्ष विजय मानकर यांनी केले. अर्थसंकल्पामध्ये सर्वांना शिक्षण, आरोग्य, निवास, रोजगार, संपत्ती आणि सामाजिक सुरक्षा लागू करण्यात यावी. एससी, एसटी, डीटी, एनटी, ओबीसी, मुस्लीम, बौद्ध, इसाई, जैन, सिख आदींवर अर्थसंकल्पापैकी ४० ते ५० टक्के खर्च करण्यात यावा. गेल्या वर्षी अर्थसंकल्पात देशातील ८५ टक्के लोकांसाठी केवळ ६.५ टक्के आर्थिक नियोजन करण्यात आले होते.हा भेदभाव यंदा होऊ नये, ही या आंदोलनाची मूख्य भूमिका असल्याचे विजय मानकर यांनी स्पष्ट केले. आंदोलनात एपीआयचे शहराध्यक्ष राजेश वालदे, डॉ. प्रदीप नगराळे, राजू कापसे, प्रल्हाद गेडाम, प्रा. राजेंद्र मोटघरे, प्रा. विकास नगराळे, विद्या भीमटे, प्रा. भगवान नन्नावरे, प्रमोद कस्तुरे, त्रिशील खोब्रागडे, एल.जी. कांबळे, मूर्ती डोंगरे, नंदा गजभिये, मंजू निकोसे, इंद्रपाल गजघाटे, प्रतिका नन्नावरे, अर्चना डोंगरे, मंजू पाटील, प्रभा भस्मे, पवन मेश्राम आदींसह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अर्थसंकल्पात हवे सामान्यांच्या विकासाचे नियोजन
By admin | Updated: January 16, 2015 00:59 IST