उमरेड / रामटेक : खरीप हंगामाची पूर्वतयारी जोमात आली असतानाच रासायनिक खतांच्या वाढत्या किमतींनंतर शेतकऱ्यांना कोमातच टाकले आहे. खरिपाच्या मागील दोन्ही हंगामांत कोरोनामुळे शेतकऱ्यांसह सारेच आर्थिक कोंडीत अडकले. अशातच हंगाम तोंडावर असतानाच खतांच्या भाववाढीला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. तत्पूर्वीच खरीप हंगामासाठी रासायनिक खतांचे नियोजन तालुकास्तरावर सुरू झाले आहे. तालुकानिहाय रासायनिक खतांची मागणीसुद्धा जिल्हा आणि पुण्याच्या कृषी आयुक्तांपर्यंत पोहोचत मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्यातील मौदा, पारशिवनी, कुही, उमरेड, रामटेकसह १३ तालुक्यांच्या मागणीची नोंद घेत मंजुरीसुद्धा प्रदान करण्यात आली आहे. युरिया, डीएपी, एमओपी, एनपीके, एसएसपी या रासायनिक खतांची एकूण मागणी तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. भिवापूर (१४,७०० मेट्रिक टन), उमरेड (१५,१००), कुही (१५,२००), मौदा (१७,७००), कामठी (१३,७००), रामटेक (१५,१००), पारशिवनी (१६,०००), सावनेर (१५,३००), कळमेश्वर (१४,४००), काटोल (१५,०००), नरखेड (१४,८००), नागपूर (१३,६००) आणि हिंगणा १३,५०० मेट्रिक टन अशी एकूण एक लाख ९४, १०० मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली आहे.
--
महाडीबीटीचे नियोजन आखा
बी-बियाणे, खते, फवारणी औषधी यांच्या बेसुमार दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत चांगलीच भर पडली आहे. आता अधिक सबसिडी जाहीर करीत खतांच्या किमतींवर अंकुश ठेवण्याचा शासनाचा प्रयत्न तूर्त स्वागतार्ह आहे. दुसरीकडे, महाडीबीटी योजनेअंतर्गत बी-बियाण्यांवर ज्या पद्धतीने सबसिडी दिली जात आहे, त्याच पद्धतीने रासायनिक खते, फवारणी औषधे तसेच कृषी अवजारे, आदींचेही नव्याने नियोजन आखावे, अशी मागणी अश्विन उके, नागसेन निकोसे, राहुल सोनटक्के, महेश तवले, प्रकाश वारे, अमोल आटे, देवेंद्र माटे, शीतल शिवनकर, रवी मलवंडे, राहुल तागडे, पुरुषोत्तम बोबडे, आदींनी केली आहे.
--
मागील काही वर्षांपासून शेती अडचणीचा विषय झाला आहे. अशातच कोरोनाच्या एंट्रीनंतर शेती आणि शेतकऱ्यांचे सारे गणितच कोलमडले. निदान अशा कठीण वेळी शासनाने बी-बियाणे, खते व फवारणी औषधांचे अल्प दरात नव्याने योग्य नियोजन आखण्याची गरज आहे.
संजय वाघमारे, नवेगाव साधू, ता. उमरेड