शरद मिरे
भिवापूर : महाडीबीटी म्हणजे ‘अर्ज एक आणि योजना अनेक’ असा गवगवा करत शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांपुढे अनुदानित बियाणांचा देखावा उभा केला. त्यानुसार तालुक्यातील तब्बल ३,२४२ शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज केले. मात्र त्यापैकी केवळ ५२९ शेतकऱ्यांनाच अनुदानित बियाणांची लॉटरी लागली. त्यामुळे महाडीबीटीकडे एका अर्जात अमर्याद योजनांचा समावेश असला तरी लाभ मात्र मर्यादित शेतकऱ्यांनाच मिळत आहे. शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी नानाविध योजना व साहित्य अनुदानावर मिळते. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना योजनानिहाय वेगवेगळे अर्ज यापूर्वी करावे लागायचे. एकाच अर्जात या सर्व योजनांचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने यंदापासून ‘महाडीबीटी पोर्टल’ ही सेवा अंमलात आणली. मात्र या पोर्टलवर अर्ज करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्याचा खरोखरच लाभ मिळतो का, असा प्रश्न विचारल्यास, त्याचे उत्तर मात्र नाही मिळते. कारण याला लॉटरी पद्धती कारणीभूत ठरली आहे. खरीप हंगामातील बियाणांसाठी तालुक्यातील ३,२४२ शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज केले. त्यापैकी केवळ ५२९ शेतकऱ्यांनाच अनुदानित सोयाबीन बियाणांची लॉटरी लागली आहे. त्यामुळे बियाणांसाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उर्वरित शेतकऱ्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. अशा लॉटरी पद्धतीमुळे शेतकऱ्यांना खरेच न्याय मिळणार का, हा प्रश्नच आहे.
तूर आणि धानाचीही लॉटरी
महाडीबीटी पोर्टलमध्ये कृषी विषयक १७ ते १८ अनुदानित योजनांचा समावेश आहे. त्यासाठी तालुक्यातील ३,२४२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले. त्यापैकी सोयाबीन बियाणाकरिता ५२९ शेतकऱ्यांना लॉटरी लागली. तर धान पिकासाठी ९९ व तूर पिकासाठी १३९ शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे. सोयाबीन बियाणासाठी ३५ अर्जदार शेतकरी वेटिंगवर आहेत. मात्र बियाणाची कमतरता असल्यामुळे वेटिंगवरील शेतकऱ्यांना ते मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. मात्र अनुदानित धान व तूर यातील सर्वांनाच मिळण्याची शक्यता आहे.
--
४०,२३३ हेक्टरचे नियोजन
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने गत वर्षी खरीप हंगामात ४०,२०९.४ हेक्टरमध्ये पीक लागवडीचे उद्दिष्ट साध्य केले होते. या वर्षी त्यात थोडी वाढ झाली असून ४०,२३३ हेक्टरचे उद्दिष्ट ठेवत कृषी विभागाने त्या पद्धतीचे नियोजन केले आहे. यात सोयाबीन १९,८०० हेक्टर, धान २,९६९ हेक्टर, कापूस १,४०८२ हेक्टर, मिरची १,०५७ हेक्टर, तूर १,५११ हेक्टर, ऊस १३ हेक्टर, हळद १२० हेक्टर, भाजीपाला ६७१ हेक्टरमध्ये लागवडीचे नियोजन केले आहे, अशी माहिती मंडळ कृषी अधिकारी श्याम गिरी यांनी दिली. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी सोयाबीन, धान, मिरची, हळद, भाजीपाला यांचे लागवड क्षेत्र वाढले आहे. तर कापूस, तूर यांचे क्षेत्र कमी झाल्याचे दिसते.