केळवद : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण व दुरुस्तीचे काम सुरू असल्याने, त्या महामार्गावरील वाहतूक नागपूर-सावनेर-छिंदवाडा या महामार्गावर वळविण्यात आली आहे. ओव्हरलाेड वाहनांमुळे या मार्गावरील केळवद-सावनेर दरम्यान खड्डे पडले असून, ते अपघाताला निमंत्रण देत आहेत. मात्र, या महामार्गाच्या दुरुस्तीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दुर्लक्ष करीत आहे, असा आराेप या भागातील नागरिकांनी केला आहे.
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने, काही भागात हा महामार्ग बंद केला आहे. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक नागपूर-छिंदवाडा या महामार्गावर वळविण्यात आली आहे. या मार्गावरून २४ तास ओव्हरलाेड वाहनांची वर्दळ सुरू असल्याने, या मार्गावरील केळवद ते सावनेर दरम्यान ठिकठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. भरधाव वाहन या खड्ड्यामधून गेल्यास ते अनियंत्रित हाेऊन तसेच खड्डे चुकविण्याच्या नादात वाहनावरील ताबा सुटून अपघात हाेत आहेत.
परिणामी, या मार्गावर खड्ड्याच्या आकारासाेबतच छाेट्या-माेठ्या अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. मात्र, या मार्गाच्या दुरुस्तीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण लक्ष देत नाही, असा आराेप सतीया लेकूरवाळे, साेनू रावसाहेब, माेहन वानखेडे, लक्ष्मीकांत बांबाेडे, विजय गुळांदे, अविनाश भांगे, अशाेक डहाके, पराग गाडगे यांच्यासह वाहनचालकांनी केला असून, दुरुस्तीची मागणी केली आहे.
---
टाेल वसुली सुरू
नागपूर-सावनेर-छिंदवाडा महामार्गावर केळवद(ता. सावनेर)नजीक टाेल नाक्याचे काम पूर्णत्वास आले आहे. या ठिकाणी वाहनचालकांकडून टाेल वसूल केला जात आहे. कंत्राटदार कंपनी केवळ टाेल वसुलीवर लक्ष केंद्रित करीत असून, राेडच्या दुरुस्तीची नैतिक जबाबदारी स्वीकारायला तयार नाही, अशा प्रतिक्रया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.