लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - मध्यरात्री गस्त करीत असलेल्या जरीपटका पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन कुख्यात गुन्हेगार पिस्तुल आणि जिवंत काडतुसांसह पोलिसांच्या हाती लागले. चेतन मधुकर मेश्राम (४३, रा. संघर्षनगर) आणि विक्की अनिल मेश्राम (रा. अमरज्योतीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपी चेतनवर २० च्या जवळपास गंभीर गुन्हे दाखल असून, त्याला तडीपारही करण्यात आले होते. विक्कीवर एक गुन्हा दाखल असून, हे दोघेही कोळसा आणि मद्य तस्करीत सक्रिय आहेत.
जरीपटक्यातील नायक पोलीस शिपाई प्रशांत महाजन आपल्या सहकाऱ्यांसह शनिवारी मध्यरात्री भीम चौक परिसरात गस्त करीत असताना, आरोपी चेतन त्याच्या ब्रिझा कार (जीजे ०५- आरएच १८१४) ने येताना दिसला. चेतन रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने प्रशांत आणि सहकाऱ्यांनी त्याला विचारपूस केली. तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांनी त्याला बाहेर काढून कारची झडती घेतली. ड्रायव्हिंग सीटच्या पायदानाखाली दोन देशी बनावटीचे दोन पिस्तुल (माउझर) आणि त्यात चार जिवंत काडतूस दिसली. ती ताब्यात घेऊन पोलिसांनी चेनतला जरीपटका ठाण्यात नेले. तेथे चौकशीत आरोपी चेतनने हे पिस्तुल विक्की मेश्रामसोबत इंदूर (मध्यप्रदेश) जवळच्या धानी येथून विकत घेतल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी विक्कीलाही अटक केली.
दरम्यान, माहिती कळताच पोलीस उपायुक्त निलोत्पल यांनी जरीपटका ठाण्यात जाऊन आरोपींची झाडाझडती घेतली. प्रत्येकी २० हजारांत (एकूण ४० हजारांत) दोन पिस्तुल आणि चार माऊझर विकत घेतल्याचे आरोपींनी सांगितले. ठाणेदार नितीन फटांगरे आणि ही कामगिरी बजावणाऱ्या चारही पोलिसांचे त्यांनी अभिनंदन केले.
---
आरोपीचे ‘चंद्रपूर कनेक्शन’
आरोपी चेतन आणि विक्की कोळसा तसेच दारू तस्करी करणाऱ्या चंद्रपुरातील गुन्हेगारांच्या टोळीशी संबंधित आहेत. त्यातून त्यांनी बरीच मायाही जमविली आहे. वर्चस्वाचा वाद आणि बक्कळ पैसा मिळत असल्याने या तस्करीत गुंतलेल्या टोळ्यांचा आपसात संघर्ष सुरू आहे. त्यामुळे चेतन आणि विक्कीच्या माध्यमातून या पिस्तुल घेऊन या दोघांचे साथीदार कुणाचा तरी गेम वाजविण्याच्या तयारीत असावे, असा संशय आहे.
----
गृहमंत्री, पोलीस आयुक्तांकडून सत्कार
सतर्कता दाखविल्यामुळे हे दोन कुख्यात गुन्हेगार पिस्तुलासह हाती लागले आणि एक मोठा गुन्हा टळला. त्यामुळे रविवारी दुपारी पोलीस जिमखान्यात आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मुक्त कंठाने प्रशंसा केली. हवलदार प्रमोद राऊत, नायक प्रशांत महाजन, रामचंद्र गजभे आणि राजेश टापरे या चाैघांना बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना ५० हजारांचा कॅश रिवॉर्ड जाहीर करण्यात आला.
----