सुमेध वाघमारे नागपूर शहरांमध्ये सुधारणेच्या नावाखाली रस्ते, पूल, उद्यान आदी गोष्टींवर अमाप पैसा खर्च होत आहे; परंतु सांडपाण्यावर प्रक्रि या करणाऱ्या व्यवस्था निर्माण केल्या जात नाहीत. सुरू झालेल्या योजना नीटपणे चालविल्या जात नाहीत. शहरातील सांडपाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मेडिकल प्रशासनाने ही बाब ओळखून लॉण्ड्री प्लान्टमधून रोज निघणाऱ्या एक लाख लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नॅशनल इन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (नीरी) व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहकार्य मिळणार आहे. या पाण्याचा वापर उद्यानांसाठी होणार आहे.येत्या काळात वारंवार येणाऱ्या अवर्षणप्रवण परिस्थितीला तोंड देण्यासाठी पाणी काटकसरीने वापरणे, पाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करणे, हा जलव्यवस्थापनाचा अविभाज्य भाग होण्याची गरज आहे. सध्या काही अपवाद वगळता सांडपाण्यावर प्रक्रि या केली जात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. मेडिकल रुग्णालयाला रोज ३३ लाख लिटर पाण्याची आवश्यकता पडते, परंतू ११ लाख लिटर पाण्यावर भागवावे लागते.उन्हाळ्यात बिकट परिस्थिती निर्माण होते. रुग्णांच्या नातेवाईकांवर पाणी विकत घेण्याची वेळ येते. अशावेळी रुग्णालयातील उद्याने पाण्याविना भकास होतात. यावर उपाय म्हणून मेडिकल प्रशासनाने सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.
मेडिकलच्या सांडपाण्यावर फुलणार बाग
By admin | Updated: April 20, 2015 02:15 IST