नागपूर : कोरोना संक्रमणामुळे आपत्कालीन पॅरोल मिळावा याकरिता मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील कैदी असगर कादर शेख व मो. याकूब नागूल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
या दोन्ही कैद्यांना १९९७ मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात विविध कलमांतर्गत एकूण ५५ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांना प्रत्येक कलमाखालील कारावास एकापाठोपाठ एक भोगायचा आहे. दोन्ही कैदी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. कोरोना संक्रमणामुळे सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना व सुधारित पॅरोल नियमानुसार आपत्कालीन पॅरोल देण्यात यावा, असे त्यांचे म्हणणे आहे. यासाठी त्यांनी सुरुवातीला कारागृह अधीक्षकांकडे अर्ज सादर केला होता. तो अर्ज नामंजूर झाल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. मीर नगमान अली कामकाज पाहतील.