हायकोर्ट : महापालिकेचा अर्ज मंजूर नागपूर : सुरक्षा व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने शहरातील मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात आहेत. त्यासाठी रात्रीही काम करण्याची अनुमती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी महानगरपालिकेला दिली. यासंदर्भात महानगरपालिकेने सादर केलेला अर्ज मंजूर करण्यात आला. रहिवासी परिसरात ध्वनी प्रदूषण होईल असे कोणत्याही प्रकारचे काम रात्री ८ ते सकाळी ८ वाजतापर्यंत करण्यात येऊ नये असा अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने १८ फेब्रुवारी २०१६ रोजी दिला आहे. परिणामी महानगरपालिकेने सीसीटीव्ही लावण्यासाठी रात्री काम करण्याची न्यायालयाकडून अनुमती घेतली. सीसीटीव्हीचे केबल टाकण्यासाठी खोदकाम केले जात आहे. त्याचा आवाज परिसरात फिरतो. वाहतुकीच्या गर्दीमुळे अनेक ठिकाणी दिवसा हे काम करता येत नाही. न्यायालयाच्या अनुमतीशिवाय हे काम रात्री केले असते तर, संबंधित आदेशाचे उल्लंघन झाले असते. परिणामी महापालिकेने न्यायालयात अर्ज सादर केला होता. बांधकामाच्या ठिकाणी रात्री होणाऱ्या ध्वनी प्रदूषणासंदर्भात नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून उच्च न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रदीप देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याप्रकरणात अॅड. एस. एन. भट्टड न्यायालय मित्र आहेत.(प्रतिनिधी)
‘सीसीटीव्ही’साठी रात्री काम करण्याची परवानगी
By admin | Updated: March 4, 2017 02:06 IST