लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुक्रवारी वाडी येथील वेलट्रिट रुग्णालयात आग लागून चार रुग्णांचा मृत्यू झाला, तर डॉक्टरसह काही रुग्ण होरपळून जखमी झाल्याची घटना घडली. मृत व जखमींच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करताना अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयाचे ऑडिट करावे, अशी मागणी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी केली.
कोविड रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णालयात खाटा शिल्लक नाहीत. कोविड व इतर आजाराच्या रुग्णांना बेड मिळावेत, यासाठी नातेवाईक जीवाचा आटापिटा करीत आहेत. अतिरिक्त शुक्ल देऊन रुग्णालयात दाखल करून योग्य उपचार व्हावेत, यासाठी प्रयत्न करीत आहेत. जीव वाचावा, यासाठी रुग्णालयात दाखल झालेला रुग्ण इतर कोणत्याही कारणाने मृत होणे ही अतिशय दुर्दैवी घटना आहे, अशी घटना कुठेही घडू नये. अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व सरकारी व खासगी रुग्णालयाचे तातडीने फायर ऑडिट करावे. फायर ऑडिट न करणाऱ्या रुग्णालयांवर मोठा दंड लावावा, असे केल्यास आग किंवा इतर अपघाती घटनांवर नियंत्रण मिळविता येणे शक्य आहे. याविषयी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले.