नागपूर : शहरात फोर- जी नेटवर्कचे जाळे निर्माण करण्यासाठी ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे. परंतु खोदकामानंतर खड्डे बुजवले जात नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. नगरसेवकांच्याही या संदर्भात तक्रारी आहेत.या बाबतचे वृत्त ‘लोकमत’ ने प्रकाशित केले होते. याची दखल घेत महापौर प्रवीण दटके यांनी शुक्रवारी खड्डे न बुजवल्यास कंपनीला दंड ठोठावण्याचे निर्देश आढावा बैठकीत दिले.शहरात फोर-जी चे केबल टाकण्याचे काम जोरात सुरू आहे. यासाठी खड्डे खोदल्यानंतर रस्ते पूर्ववत केले जात नसल्याने अपघात वाढले आहेत. यामुळे लोकांमध्ये रोष निर्माण झाला असल्याने दटके यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत बैठक घेतली. झोनचे सहाय्यक आयुक्त, उप अभियंता व केबल टाकण्याच्या कामावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले. या कामावर नियंत्रण ठेवण्याची जबादारी कार्यकारी अभियंता महेश गुप्ता यांची आहे. परंतु त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप कंपनीवर कार्यवाही करण्यात आलेली नव्हती.खड्डा खोदल्यानंतर केबल टाकण्याचे काम संपताच रस्ता पूर्ववत व्हायला हवा. परंतु असे होत नाही, या प्रकाराला आळा घालण्यासाठी खड्ड्यानुसार दंड आकारण्याची जबाबदार गुप्ता यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच मनपाची अनुमती न घेता खोदकाम होत असल्याचे आढळून आल्यास संबंधितावर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. (प्रतिनिधी)
खड्डे न बुजवल्यास दंड
By admin | Updated: February 7, 2015 02:03 IST