नागपूर : मानकापूर येथील जगदंबा हाईटस्मध्ये झालेल्या मोहित पीटर याच्या खुनातील पाच आरोपींच्या पोलीस कोठडीत प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. एस. शर्मा यांच्या न्यायालयाने ९ जुलैपर्यंत वाढ केली. तंबी ऊर्फ जेम्स बबलू ऊर्फ क्लेमंट गबरेल (२१) , ब्रायन ऊर्फ इब्राहिम बॅस्टिन कॅनेथ (२१) दोन्ही रा. मार्टीननगर, राजेंद्र ऊर्फ पापा जयराम साळवे (२२) रा. कौशल्यायननगर, सचिन ऊर्फ अण्णा पलटी डॅनिएल गबरेल (२७) आणि आशिष ऊर्फ मॅडी वीरेंद्र राठोड (२६) रा. स्वावलंबीनगर, अशी आरोपींची नावे आहेत. यापूर्वी याच गुन्ह्यातील सागर ऊर्फ फ्रँक अन्थोनी आणि दीपक ऊर्फ अँगल फ्रान्सिस अलेक्झांडर, यांचा ५ जुलैपर्यंत पोलीस कठडी रिमांड घेण्यात आलेला आहे. या पाच आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपताच त्यांना तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अवधेश त्रिपाठी यांनी न्यायालयात हजर केले. २६ जून २०१५ रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास दहा-बारा जणांनी मोहित मार्टिन पीटर हा मानकापूर येथील जगदंबा हाईटस्स्थित मार्लिन बिल्डिंग मटेरियल ट्रान्सपोर्टच्या दुकानात मिखील मायकल फ्रान्सिस याच्यासोबत बसला असता तंबी आणि त्याच्या साथीदारांनी सशस्त्र हल्ला करून पीटरचा भीषण खून केला होता. घटनेच्या दिवशीच गिट्टीखदान पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. त्यानंतर रविवारी सागर आणि दीपक यांना अटक केली होती. आज सहायक सरकारी वकील रत्ना घाटे यांनी पाचही आरोपींचा ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी रिमांड वाढवून देण्यात यावा, अशी मागणी केली. आरोपींकडून या खुनासाठी सुपारी देणाऱ्या सूत्रधाराचा शोध घेऊन अटक करावयाची आहे. आरोपींच्या आणखी साथीदारांना अटक करणे आहे. त्यांचा ठावठिकाणा आरोपींकडून माहीत करून घेणे आहे, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. बचाव पक्षाचे वकील अॅड. लुबेश मेश्राम यांनी वाढीव पोलीस कोठडी रिमांड मागणीचा विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपींच्या पोलीस कोठडीत ९ जुलैपर्यंत वाढ केली. (प्रतिनिधी)
पीटरच्या खुनातील पाच आरोपींचा पीसीआर वाढला
By admin | Updated: July 4, 2015 03:12 IST