मोठा अनर्थ टळला : ‘अँकर लिंक’चे झाले होते तुकडेनागपूर : राजधानी एक्स्प्रेसचा पेंटो ओएचई तारेला अडकल्यामुळे या गाडीची कपलिंग तुटून कोचला सोडून इंजिन पुढे गेले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री छत्तीसगड एक्स्प्रेसच्या ‘अँकर लिंक’चे तुकडे तुकडे झाल्याची गंभीर घटना पुढे आली आहे. वेळीच नागपूर रेल्वेस्थानकावर नवे अँकर लावल्यामुळे संभाव्य मोठा अपघात टाळता आला.मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेगाडी क्रमांक १८२३७ बिलासपूर-अमृतसर छत्तीसगड एक्स्प्रेस शुक्रवारी रात्री १० वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर आली. कॅरेज अॅन्ड वॅगनच्या कर्मचाऱ्यांनी रेल्वेगाडीची नियमित तपासणी केली असता इंजिनच्या अखेर जोडलेल्या एसएलआर कोच (०६७०४)च्या चेसिस(ट्रॉली)मध्ये लावलेल्या अँकर लिंकचे तुकडे तुकडे झाल्याचे लक्षात आले. त्वरित अँकर लिंक दुरुस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले. कोचच्या चेसिसला नवे अँकर लिंक लावण्यात आले. या कामात दोन तासांचा वेळ लागला. त्यानंतर ही गाडी रात्री १२.१० वाजता इटारसीकडे रवाना करण्यात आली. जर नागपुरात अँकर लिंकचे तुकडे झाल्याची बाब निदर्शनास आली नसती तर रेल्वेगाडी रुळावरून घसरून मोठी जीवितहानी होण्याची घटना घडली असती. अँकर लिंक देतो कोचला दिशारेल्वेगाडीच्या कोचच्या चेसिस(ट्रॉली)मध्ये अँकर लिंक लावलेले असते. कोचला दिशा दाखविण्यात अँकर लिंकची भूमिका महत्त्वाची असते. रेल्वे रुळ बदलताना केवळ ट्रॉलीची मुव्हमेंट होते. हे काम अँकर लिंकशिवाय शक्य होत नाही. छत्तीसगड एक्स्प्रेसचा अँकर लिंक तुटल्यामुळे हे कार्य शक्य न होऊन गाडी रुळाखाली घसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.रायपूर, बिलासपूरला का आढळल्या नाही त्रुटी?छत्तीसगड एक्स्प्रेस नागपूरला येण्यापूर्वी रायपूर आणि बिलासपूर रेल्वेस्थानकावर या गाडीची ‘इन रुट’ तपासणी झाली होती. दरम्यान, या गाडीच्या एसएलआर कोचची अँकर लिंक तुटल्याची बाब त्यांना का दिसली नाही? दिसली तर ती दुरुस्त का केली नाही? या प्रश्नांची उत्तरे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचा यांत्रिक विभागच देऊ शकतो.
छत्तीसगड एक्स्प्रेसमधील प्रवासी बचावले
By admin | Updated: June 4, 2017 01:30 IST