नागपूर : २६ नोव्हेंबर हा दिवस देशात संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता या दिवशी पुकारलेला संप अयोग्य व चुकीचा असून संपाचा निर्णय घेताना काही प्रतिगामी प्रवृत्तीचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भूमिका मांडत काही राज्य, जिल्हा परिषद व इतर कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपात आपला सहभाग नसल्याचे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने जाहीर केले आहे. २६ नोव्हेंबर रोजी दिवशी भारतीय राज्य घटना देशाला समर्पित करण्यात आली होती. हा दिवस राष्ट्रीय उत्सवाप्रमाणे साजरा करण्यात येतो, या दिवशी संपूर्ण देशात भारतीय राज्य घटनेचे वाचन करण्यात येऊन संविधानप्रति निष्ठा व्यक्त करण्यात येते. शिवाय याच दिवशी मुंबई येथील हल्ल्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक शहीद झाले होते. या शहिदांना संपूर्ण देशात भावपूर्ण आदरांजली वाहण्यात येते. संपाच्या आड या दिवशी गालबोट लावण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे या संपात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्यातील ६ लाख कर्मचारी सहभागी होणार नाहीत, असे महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी स्पष्ट केले आहे.
संपाचा निर्णय घेताना कुणालाही विश्वासात घेण्यात आले नाही, हा संप एकतर्फी निर्णय घेऊन पुकारला आहे. संपाच्या मागण्यात राज्यातील मागण्या कमी, तर राष्ट्रीय पातळीवरील मागण्या जास्त व अवास्तव आहेत. राष्ट्रीय पातळीवरील मागण्यांशी राज्य कर्मचाऱ्यांचा संबंध नाही. त्यामुळे संपात कुणीही सहभागी न होता कामावर उपस्थित राहून शासनास सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.