डिक्कीच्या अध्यक्षांचे आवाहन : राष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शननागपूर : देशाची बॅलेन्सशीट कितीही मोठी झाली तरीही विकासात वंचितांना सहभागी न केल्यास तो विकास चिरस्थायी ठरणार नाही, अशी डिक्कीची भूमिका आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अलीकडेच बिझनेस समिटमध्ये यावर मत मांडले. त्यामुळे सरकारने देशाचा विकास साध्य करताना वंचितांना सहभागी करून घेण्याचे आवाहन दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचे (डिक्की) चेअरमन पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केले. कौशल्य आधारित प्रशिक्षणदलित तरूणांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण मिळावे म्हणून डिक्की गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्नरत आहे. ३० जणांच्या ३० दिवसीय पहिल्या बॅचचे उद्घाटन आज झाले. इन्फ्रास्ट्रक्चरवरील प्रशिक्षणाचा प्रारंभ देशात पहिल्यांदा नागपुरात झाला. देशात सर्वच चॅप्टरतर्फे आयोजन करण्यात येईल. या प्रशिक्षणाने उद्योजक होण्यास मदत होईल. उद्योजकांना प्रोत्साहन, विपणन आणि नेटवर्किंगचा मार्ग दाखविणे हा डिक्कीचा कार्यक्रम आहे. पुढील काही वर्षात आयटी, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॅम्युनिकेशन क्षेत्रात ४५ लाख कुशल तरुणांची गरज भासणार आहे. डिक्कीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणीकांबळे यांनी सांगितले की, देशाच्या प्री-बजेटमध्ये डिक्कीचे मत मागविले जाते, ही आमच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर डिक्कीच्या मतांची दखल घेतली जाते. जर्मन, इस्रायल व अमेरिकन वाणिज्य दूतावासाकडून डिक्कीला बोलविणेही आले आहे. केंद्र सरकारकडून दलित उद्योजकांसाठी २०० कोटींचा फंड मंजूर केला आहे. कौशल्य आधारित प्रशिक्षणासाठी सरकारने अर्थसंकल्पीय तरतूद करावी, अशी मागणी आहे. दलित उद्योजकांसाठी क्रेडिट गॅरंटी योजना तयार करावी. देशात २२ सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत. या बँकांच्या १ लाखांपेक्षा जास्त शाखा आहेत. प्रत्येक बँकेच्या प्रत्येक शाखेवर दलित तरुणाला मेंटर म्हणून नियुक्त करावे. त्यामुळे उद्योजकांची निर्मिती होईल, असे कांबळे यांनी स्पष्ट केले. डिक्कीतर्फे औद्योगिक प्रदर्शनडिक्कीचे औद्योगिक प्रदर्शन अलीकडेच झालेल्या डोवासच्या धर्तीवर व्हावे. १३ ते १५ फेब्रुवारीपर्यंत हैदराबाद येथे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन मैदान माधापूर येथे होणार आहे. तेलंगाणा सरकार, टाटा उद्योग समूह आणि एनएसआयसी यांचे सहकार्य लाभले आहे. उद्घाटन तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते होईल. जवळपास ४०० स्टॉलमध्ये दलित उद्योजकांच्या गुणवत्तापूर्ण उद्योजकांचे ३०० स्टॉल, सरकारी क्षेत्रातील कंपन्यांचे ५० स्टॉल, वित्तीय संस्थांचे २० स्टॉल आणि खासगी कंपन्यांचे ३० स्टॉल राहणार आहे. सरकारचे नवीन खरेदी धोरण व त्यामध्ये एस/एसटी उद्योजक आणि महिलांसाठी संधी, स्कील डेव्हलपमेंट या विषयांवर नामंवत उद्योजक आणि तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असल्याचे कांबळे म्हणाले.माहिती देतेवेळी डिक्कीचे संरक्षक अरुण खोब्रागडे, अध्यक्ष निश्चय शेळके, डीसीआरचे संचालक सुनील झोडे, किरण मेश्राम, अभिताभ मेश्राम, अश्विन कापसे, हेमंत गणवीर, सुधीर बागडे, महिला विंगच्या अध्यक्षा विनी मेश्राम उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
वंचितांना विकासात सहभागी करा
By admin | Updated: February 4, 2015 00:59 IST