शाळेतील शौचालये, पुस्तकालये सोयीचे नाहीत : आज जागतिक अपंगदिननागपूर : सोयीसुविधांच्या दृष्टिकोनातून अपंग व अधू व्यक्तींचा विचार आपल्या देशात अजिबात केला जात नाही. अपंगांसाठी अनेक योजना आहेत. पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. अनेक शाळांच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करण्यासाठी रॅम्प लिफ्टची सोय नाही. शाळेतील शौचालय, पुस्तकालय इत्यादींमध्ये अपंगांसाठी ते उपयुक्त नसल्याचे चित्र आहे. अपंगांसाठी अनेक योजना आहेत, पण त्याची अंमलबजावणी होताना कुठे दिसतेय? अशा योजनांचा अपंग व्यक्तींना फायदा पूर्णपणे मिळतोय की नाही, त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतात की नाही, याची तपासणी केली जात नाही. अशा योजनांमार्फत दिल्या गेलेल्या सवलतींचा त्यांना काही उपयोग होतो की नाही, याची कोणी विचारपूस करीत नसल्याने अपंग व्यक्ती अनेक सोयींपासून वंचित राहत असल्याचे दिसून येते. साध्या प्रवासाचा विचार केला तर शहरात फ्लोअर बसेस उपलब्ध नाहीत. त्यामुळे व्हीलचेअरवर बसलेला अपंग प्रवासी बसमध्ये प्रवेश करू शकत नाही. अंधांना बसस्थानकाची माहिती कळण्यासाठीची उद्घोषणा यंत्रणा कुठेही उपलब्ध नाही. रेल्वेच्या प्लॅटफॉर्मची उंचीही विकलांगांसाठी नेहमीच अडचणीची ठरते. अपंगांसाठी सोयीस्कर शौचालयाची तर सगळीकडे गरज आहे. तिकीट-खिडक्यांची उंची जास्त असल्यामुळे बुटक्या, व्हीलचेअर वापरणाऱ्या व अपंग प्रवाशांना तिकीट घेण्यास अडचण होते. रेल्वेच्या अपंगांच्या डब्यात योग्य प्रकारची हॅन्डल्स, बैठक व्यवस्था, मोकळी जागा, उपलब्ध नाही. शासकीय रुग्णालयांमध्ये व कार्यालयात रॅम्प आहेत, पण तिथे त्यांचा उतार योग्य नाही किंवा जास्त असते. तसेच गुळगुळीत टाईल्स असल्यामुळे पाय घसरून पडण्याची भीती असते. विशेष म्हणजे, बहुतेक सरकारी कार्यालयांमध्येही प्रवेश करण्यासाठी रॅम्पची व्यवस्था नाही. अंधांसाठी ब्रेललिपीत लिहिलेले कामकाजाचे अर्ज अनेकदा उपलब्ध नसतात. उद्यान, शॉपिंग मॉल, इतर फिरण्याच्या ठिकाणीही अपंगांच्या दृष्टीने योग्य काळजी घेतली गेलेली नसते. या समस्या सोडविण्याची मागणी आता सर्व स्तरातून होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)
अपंगांच्या सोईला दिरंगाईचा लकवा
By admin | Updated: December 3, 2014 00:36 IST