आनंद डेकाटे ल्ल नागपूरकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हे दीक्षाभूमीला भेट देणार आहे. त्यांच्यासोबत असणारा नेत्यांचा मोठा फौजफाटा लक्षात घेता त्यांना दीक्षाभूमीतील मध्यवर्ती स्मारकामध्ये काही क्षण घालवता यावे, या उद्देशाने मोजक्याच लोकांना आत प्रवेश मिळणार असल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबत असणाऱ्या व्हीव्हीआयपी नेत्यांची संख्या लक्षात घेता ही संख्या ११ च्या जवळपास असू शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे ११ एप्रिल रोजी कस्तुरचंद पार्कवर भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे देशभरातील ज्येष्ठ नेते येणार आहेत. या दरम्यान ते दीक्षाभूमीलाही भेट देतील. सोनिया गांधी व राहुल गांधी यांना दीक्षाभूमीतील मध्यवर्ती स्मारकामध्ये काही वेळ निवांतपणे घालवता यावा म्हणून काँग्रेसतर्फे काही मोजकी मंडळी त्यांच्यासोबत राहतील. दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, सचिव सदानंद फुलझेले हे त्यांचे स्वागत करतील. यावेळी स्मारक समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहतील. दीक्षाभूमीवर घालवणार पाऊण तास ४सोनिया व राहुल गांधी हे दीक्षाभूमीवर जवळपास पाऊण तास राहतील. यातील सर्वाधिक वेळ त्या मध्यवर्ती स्मारकामध्ये घालवतील. ११ एप्रिल रोजी त्या जवळपास ४ ते ५ वाजताच्या दरम्यान दीक्षाभूमीवर येतील. यात दीक्षाभूमीवरील मध्यवर्ती स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिकलशाला अभिवादन करतील. मध्यवर्ती स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांचेही अवलोकन करतील. दिग्विजय सिंह यांनी केले मान्य ४काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी दीक्षाभूमीला भेट दिली होती. त्यांची ही भेट सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल्याला भेटायला बोलावले होते. त्यांना भेटायला गेलो तेव्हा दिग्विजयसिंह यांनी दीक्षाभूमीवर येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी दीक्षाभूमी परिसराची पाहणी केली. त्यावेळी आपण त्यांना स्मारकामध्ये होणाऱ्या गर्दीची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा त्यांनी आमच्याकडून मोजकेच लोक आत येतील, असे सांगितले.
सोनिया-राहुल यांच्यासह निवडकांनाच दीक्षाभूमीत प्रवेश
By admin | Updated: April 4, 2016 06:00 IST