मौदा : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यावर मात करण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक लस अत्यंत सुरक्षित व प्रभावी उपाय असल्याचे अनेक विद्वानांनी विविध माध्यमातून समजावून सांगितले आहे. परंतु कोरोनाच्या बाबतीत सोशल मीडियाच्या माध्यमातून नकारात्मक विचार पसरविण्याचे काम काही समाजकंटक करीत आहेत. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम ग्रामीण भागात होताना दिसत आहे. अशा लोकांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. इकडे तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘लस टोचाल तर वाचाल’ हे ब्रीद स्वीकारत लसीकरण मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी तसेच १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांनी कोविड लस घ्यावी, असे आवाहन तहसीलदार प्रशांत सांगडे, खंडविकास अधिकारी दयाराम राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रूपेश नारनवरे व पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे, शिक्षणाधिकारी आशा गणवीर यांनी केले आहे. त्यांचे सहकारी गावोगावी जाऊन लसीकरणाबाबत जनजागृती करीत आहेत.
या ठिकाणी होणार लसीकरण
मौदा तालुक्यातील तांडा, माथनी, कोटगाव, पीएचसी तारसा, पीएचसी चिरव्हा, पीएचसी खात, पीएचसी कोदामेंढी व मौदा येथील जनता विद्यालयात गुरुवारी लसीकरण होणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली.