लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दीड महिन्यांपूर्वी प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांवर पोहोचलेल्या कांदे-बटाट्याच्या भावात सध्या बरीच घसरण झाली आहे. कांदे ठोक बाजारामध्ये १५ ते ३० रुपये किलो आणि बटाट्यांचे भाव १० ते १६ रुपयांदरम्यान आहेत. लालच्या तुलनेत पांढऱ्या कांद्याचे भाव कमी आहेत. लसूणची आवक जास्त असतानाही भाव वाढले आहेत. किरकोळ बाजारामध्ये १२० ते १५० रुपये किलोचा भाव आहे.
कळमना ठोक बाजारात लाल कांद्याचे १५ ट्रक (एक ट्रक ३० टन) आणि पांढऱ्या कांद्याचे ५ ते ७ ट्रक येत आहेत. लाल कांदे जळगाव, नाशिक येथून तर पांढरे कांदे गुजरात व नाशिक येथून येत आहेत. अमरावती आणि अकोला येथील पांढरे कांदे मार्च महिन्यात बाजारात येतील. सध्या सर्वच राज्यांमध्ये कांद्याचे उत्पादन निघाल्याने भाव उतरले आहेत. विदेशातही उत्पादन जास्त असल्याचा परिणाम निर्यातीवर झाला आहे. पूर्वीच्या तुलनेत निर्यात कमी असल्याची माहिती कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी दिली.
दीड महिन्यांपूर्वी किरकोळमध्ये बटाट्याचे भाव ५० ते ६० रुपये होते. पण आता उत्तर प्रदेशासह अन्य राज्यांमध्ये बटाट्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात बाजारात आले आहे. कळमन्यात आग्रा, प्रयागराज, कानपूर, इटावा या जिल्ह्यांतून दररोज २० ट्रकची आवक होत आहे. आवक जास्त असल्याने यावर्षी बटाट्याचा स्टॉक मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे पुढे भाव वाढणार नाहीत.
लसूण महागच
मध्यंतरी मुसळधार पावसामुळे लसणाचे पीक खराब झाले होते. तेव्हा किरकोळ बाजारात भाव १८० रुपयांपर्यंत पोहोचले होते. पण आता मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्हा आणि लगतच्या परिसरात लसूणचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने कळमना बाजारात आवक वाढली आहे. दररोज ५ ते ७ ट्रकची आवक होत आहे. दर्जानुसार ठोक बाजारामध्ये ५० ते ९० रुपये किलो तर किरकोळ बाजारामध्ये १४० रुपये किलोपर्यंत विक्री होत आहे. गेल्यावर्षी याचकाळात ८० ते ९० रुपयांपर्यंत भाव होते. कळमन्यातून लगतच्या राज्यात मोठ्या प्रमाणात लसूण विक्रीसाठी जात असल्याचे वसानी यांनी सांगितले.