जलालखेडा : अंगावर वाहन आणल्यावरून उद्भवलेला वाद विकाेपास गेला आणि तिघांनी एकास बेदम मारहाण केली. त्यात ताे गंभीर जखमी झाला. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खराळा येथे घडली.
नितीन धनराज ठाकरे (४१) असे जखमीचे तर दिलीप लालाजी ठाकरे (५०), पंकज अण्णाजी ठाकरे (२३) व चेतन अण्णाजी ठाकरे (२४) अशी आराेपींची नावे आहेत. हे सर्व जण खराळा (ता. नरखेड) येथील रहिवासी आहेत. नितीन गावातील चाैकात उभा असताना या तिघांनी त्याला गाठले आणि पंकज व चेतनच्या आईच्या अंगावर वाहन का आणले, अशी विचारणा केली. याच कारणावरून त्यांच्यात भांडणाला सुरुवात झाली. दरम्यान, तिघांनी नितीन यांना लाथाबुक्क्या व काठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जलालखेडा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात उपचार करण्यात आले. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी भादंवि ३२४, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून तिन्ही आराेपींना अटक केली. या घटनेचा तपास पाेलीस नाईक प्रज्याेत तायडे करीत आहेत.