काटाेल : रेल्वे रूळ ओलांडताना मालगाडीची धडक बसून एकाचा मृत्यू झाला. ही घटना काटाेल शहरातील मूर्ती मार्गावरील रेल्वे फाटकाजवळ घडली. उडिया डुल्लामन्नी (४०, रा. ओडिशा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
उडिया १२ वर्षांपूर्वी कामाच्या शाेधात काटाेल शहरात आले हाेते. तेव्हापासून ते काटाेल शहरातील हाॅटेलमध्ये काम करून उदरनिर्वाह करायचे. ते काम आटाेपून घराकडे पायी जात हाेते. रेल्वेगाडी येत असल्याने मूर्ती मार्गावरील फाटक बंद केले हाेते. मात्र, उडिया यांनी फाटक बंद असताना रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यात जाेरात आलेल्या मालगाडीने त्यांना जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना काटाेल शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.