नागपूर : गुन्हेगारांवर अंकुश ठेवा अन् दडपणमुक्त होऊन काम करा, असा हितोपदेश पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सोमवारी येथील शिर्षस्थ अधिकाऱ्यांंना दिला. पोलीस आयुक्तालयात घेतलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांंच्या बैठकीत दीक्षित यांनी नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती समजून घेतानाच येथील अधिकाऱ्यांंच्या अडचणीही जाणून घेतल्या. दुपारी ३.१५ वाजता ते पोलीस आयुक्तालयात पोहचले. येथे सहपोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे आणि शहरातील सर्वत्र पोलीस उपायुक्तांची बैठक घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत दीक्षित यांनी गुन्हेगारीवर अंकुश ठेवून दडपणमुक्त काम करण्याचा हितोपदेश अधिकाऱ्यांना दिला. सहा वर्षांपूर्वी दीक्षित येथे पोलीस आयुक्त होते. त्यांना नागपूरच्या कानाकोपऱ्याची चांगली माहिती आहे. येथील गुन्हेगारी आणि मनुष्यबळाचीही जाण आहे. आहे त्या मनुष्यबळात चांगले काम कसे करता येईल, त्यावर लक्ष देण्याचा सल्ला दीक्षित यांनी अधिकाऱ्यांना दिला. त्यांनी काही अनुभवही अधिकाऱ्यांसमोर कथन केले. पोलीस मित्रांचा कसा फायदा होतो, ते सांगताना पोलीस मित्रांची संख्या वाढविण्याचा सल्लाही त्यांंनी दिला.गुन्हेगारी, पोलिसांचे संख्याबळ, अधिकाऱ्यांची रिक्त पदे, अधिकाऱ्यांसमोरच्या अडचणीही त्यांनी ऐकून घेतल्या. वाढीव पोलीस ठाणे, शहरातील पोलिसांशी संबंधित मंजूर झालेले मात्र शासनदरबारी पडून असलेली प्रकरणे तातडीने कशी मार्गी लावता येतील, त्याचा आपण प्राधान्याने प्रयत्न करू, असे आश्वासनही दीक्षित यांनी अधिकाऱ्यांंना दिले.(प्रतिनिधी)प्रामाणिकपणा, नीतिमत्तेचाही मंत्र नक्षलविरोधी अभियानाच्या सुराबर्डीतील अपारंपरिक प्रशिक्षण केंद्राची पाहाणी केल्यानंतर महासंचालक दीक्षित यांनी पोलीस मुख्यालयालाही भेट दिली. पोलीस प्रशिक्षण शाळेत प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रामाणिकपणा, नितिमत्ता, सुदृढतेचा मंत्र पोलिसांना दिला. प्रशिक्षण शाळेतील प्रशिक्षणार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी सामाजिक सेवा म्हणून पोलीस दलात नोकरी केली जावी, असे म्हटले. पोलीस दलाला भ्रष्टाचार मुक्त करण्याची गरज विशद करून पुस्तकी ज्ञानासोबत तंत्रज्ञान आणि नितिमत्ताही महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. स्वत:ला मानसिक आणि शारिरिकदृष्ट्या सुदृढ बनविण्यासाठी त्यांनी व्यायामाचे महत्त्वही प्रशिक्षाणार्थ्यांना समजावून सांगितले.
पोलीस महासंचालकांच्या अधिकाऱ्यांना टीप्स
By admin | Updated: October 6, 2015 04:13 IST