लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : शहरातील मुख्य रस्त्यावर भरत असलेला भाजीबाजार वाहनचालक व नागरिकांसाठी डाेकेदुखी ठरत आहे. भाजीविक्रेते मनमर्जीने ऐन रस्त्यावर आपली दुकाने थाटत असल्याने या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
शहरात भाजी दुकानदारांच्या संख्येत वाढ झाली असून, मुख्य रस्त्यावर भाजीबाजार भरत आहे. कुणीही कुठेही आपले दुकान थाटतात. त्यामुळे रस्त्यावर किंवा रस्त्याच्या मधाेमध दुकान थाटणाऱ्या या भाजीविक्रेत्यांवर वचक कुणाचा, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. विशेष म्हणजे, पाेलीस अथवा नगर परिषद प्रशासन यापैकी कुणाचीही भीती या भाजीविक्रेत्यांना नाही. त्यामुळेच ते कुठेही मनमर्जीने दुकाने थाटतात. या परिसरातून पायी चालणेही कठीण हाेते. अनेक नागरिक आपली वाहने रस्त्यावर उभी करून भाजीपाला खरेदी करताना दिसून येतात.
या प्रकारामुळे भाजीबाजार परिसरात दिवसातून अनेकदा वाहतुकीचा खाेळंबा हाेताे. दुसरीकडे याठिकाणी वाहतूक पाेलीस दिसून येत नाही. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पाेलीस यंत्रणा व नगर परिषद प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून भाजीविक्रेत्यांची व्यवस्था माेकळ्या जागी करून देण्याची मागणी नागरिकांकडून हाेत आहे.