नागपूर ; जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने वर्षभरात जिल्ह्यातील ४२००० रुग्णांची नेत्रतपासणी करून शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती आरोग्य समितीच्या बैठकीत बुधवारी देण्यात आली. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासोबतच आयुर्वेदिक व उपजिल्हा रुग्णालय, ट्रस्ट, मेयो व मेडिकल आदींच्या सहभागातून हा उपक्र म राबविला जात आहे. मे महिन्यात १३८३ रुग्णांवर नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मेयो व मेडिकल रुग्णालयात दर महिन्याला ५५०० रुग्णांची तपासणी करून गरजूवर शस्त्रक्रि या केल्या जातात. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्र मांतर्गत संशयित २६६१२ हिवताप रुग्णांचे रक्त नमुने तपासण्यात आले. यात १४ नमुने दूषित असल्याचे आढळून आले. यावर उपायोजना करण्यात आल्या. मागील चार महिन्यात १४४९४६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात ४७ नमुने दूषित आढळून आले. त्यांचेवर उपचार केले जात आहे. राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्र मांतर्गत १२०५४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. हत्तीरोगाचे ३८ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात हत्तीरोग निर्मूलनासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती जि.प.चे उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी दिली.पावसाळ्याच्या दिवसात साथरोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. ही बाब विचारात घेता साथरोग नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहे. जिल्ह्यातील साथरोग उदभवल्यांतर नियंत्रणासाठी वेळीच कार्यवाही न केल्यास दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा चिखले यांनी दिला आहे. बैठकीला जि.प.सदस्य जयकुमार वर्मा, माया कुसुंबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद गणवीर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
४२ हजार नेत्र शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट
By admin | Updated: June 24, 2014 00:59 IST