लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा संघटनांनी आयोजन वाढवावे तसेच राष्ट्रीय पदके जिंकण्यास खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, हा हेतू डोळ्यापुढे ठेवून महाराष्ट्र ॲथ्लेटिक्स संघटनेने (एमएए) निवडणुकीचा नवा फाॅर्म्युला आणला आहे. यानुसार चार वर्षांच्या कारकिर्दीत जिल्हा संघटनेने किती स्पर्धा तसेच शिबिरांचे आयोजन केले आणि त्यांच्या खेळाडूंनी किती पदके जिंकली, यावर त्या जिल्ह्याच्या मतांचा कोटा निश्चित होईल.
एमएएची आगामी निवडणूक २० डिसेंबर रोजी पुण्यात होत असून, त्यासाठी १३ डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. याआधी एका जिल्हा संघटनेला एका मताचा अधिकार होता. एकूण ३२ संलग्न जिल्हा संघटनांपैकी सहा जिल्हा संघटनांना प्रत्येकी तीन मतांचा नागपूरसह अन्य सहा जिल्हा संघटनांना प्रत्येकी दोन मतांचा तर उर्वरित जिल्हा संघटनांना प्रत्येकी एका मताचा अधिकार असेल.
यासंदर्भात माहिती देताना नागपूर जिल्हा ॲथ्लेटिक्स संघटनेचे सचिव डॉ. शरद सूर्यवंशी म्हणाले, ‘ही पद्धत लागू करण्यामागे जिल्हा संघटनांना सक्रियपणे काम करण्याची संधी बहाल करणे तसेच अधिकाधिक आयोजनास प्रोत्साहन देणे हा आहे. सध्या काहीच जिल्हे सक्रिय आहेत. सर्वच जिल्हा संघटनांना कामाची संधी देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.’
नियमित आयोजन आणि पदक जिंकण्यातही आघाडीवर असलेल्या नागपूरला केवळ दोन मतांचा अधिकार का, अशी विचारणा केली तेव्हा सूर्यवंशी म्हणाले, ‘आम्ही नियमित आयोजनात पुढे आहोत, मात्र राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्यात मागे असल्याने केवळ दोन मतांचा अधिकार असेल.
ऑलिम्पिक धावपटू राहिलेले आदिल सुमारीवाला हे महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष तर सतीश उचिल हे सचिव आहेत. यापुढील चार वर्षांसाठी मीदेखील सचिवपदासाठी इच्छुक असल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली. मी याआधी संयुक्त सचिवपदी काम केले आहे. याआधीही सचिवपदासाठी इच्छुक होतो, मात्र नंतर कार्यकारी सदस्य बनविण्यात आले,’ असे सूर्यवंशी यांनी सांगितले.
पुढील चार वर्षे सुमारीवाला हेच अध्यक्षपदी कायम असतील, असे संकेत मिळत आहेत. ते भारतीय ॲथ्लेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी विराजमान असल्याने त्यांच्या अनुभवाचा महाराष्ट्र संघटनेला लाभ होईल, असा यामागील तर्क आहे.