नागपूर : महानगरपालिकेने आपली बसची संख्या टप्प्याटप्प्याने वाढविण्याची घोषणा केली हाेती. परंतु, आतापर्यंत निम्म्या बसेसही रोडवर आणल्या नाहीत. आता प्रवाशांची संख्या वाढली आहे. सकाळी व सायंकाळी बुटीबोरी, हिंगणा, खापरखेडा, पारडी, कामठी इत्यादी मार्गावरील बसेसमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन होते. ही परिस्थिती पाहता मनपाला नागरिकांपेक्षा तिजोरीची चिंता जास्त असल्याचे स्पष्ट होत आहे.
लॉकडाऊनपूर्वी शहरात ३६० बसेस धावत होत्या. लॉकडाऊन काळात या सर्व बसेस सुमारे आठ महिने बंद राहिल्या. दरम्यान, अन्य महानगरपालिकांनी बसेस सुरू केल्यानंतर नागपूर महानगरपालिकेनेही बसेस रोडवर उतरवल्या. त्यावेळी बसेसची संख्या टप्प्याटप्प्याने वाढविण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याचा मनपाला विसर पडला आहे. प्रवासी वाढले असताना सध्या केवळ १७२ बसेसच धावत आहेत. ऑटो व कॅब चालक या परिस्थितीचा फायदा घेत आहेत. ते प्रवाशांकडून अधिक भाडे वसूल करीत आहेत.
--------------
रोज ४० हजार प्रवासी
सध्या आपली बसमध्ये रोज सुमारे ४० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. आधी ही संख्या १८ ते २० हजार होती. सकाळी व सायंकाळी प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागतो.
------
सकाळी, सायंकाळी फेऱ्या वाढणार
वर्तमानात सुरू असलेल्या बसेसमधून रोज सुमारे ७५ हजार प्रवासी प्रवास करू शकतात. परंतु, सध्या ३५ ते ४० हजार प्रवासीच प्रवास करीत आहेत. केवळ सकाळी व सायंकाळी प्रवाशांची संख्या जास्त असते. त्यामुळे या वेळेत बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात येतील.
----- रवींद्र पागे, प्रशासकीय अधिकारी, मनपा परिवहन विभाग.