नागपूर : स्वाईन फ्लूचा पडलेला विळखा लक्षात घेत आरोग्य विभागाकडून नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, स्वाईन फ्लूचा संसर्ग होऊ नये म्हणून मास्कचा वापर वाढला आहे. विशेषत: शासकीय इस्पितळात डॉक्टरांसह बहुसंख्य रुग्ण व त्यांचे नातेवाईक मास्क घालून वावरताना दिसून येत आहे, परंतु वापरलेले मास्क कचरापेटीत न टाकता उघड्यावर कुठेही फेकण्याची वृत्ती वाढल्याने आजार कमी होण्यापेक्षा तो पसरण्याची शक्यता आहे. शहर स्वाईन फ्लूच्या दहशतीत आहेत. आतापर्यंत २२ रुग्णांचा मृत्यू झाला असून १३३ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. स्वाईन फ्लूच्या संसर्गपासून दूर राहण्यासाठी अनेक रुग्ण मास्क घालून आपले दैनंदिन काम करताना दिसून येत आहे. विशेषत: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मास्क घालणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याला कारण म्हणजे मेडिकलमध्ये आतापर्यंत १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या शिवाय येथील ३० खाटाच्या स्वाईन फ्लू वॉर्डात २० तर बालरुग्णाच्या स्वाईन फ्लू वॉर्डात ९ रुग्ण उपचार घेत आहेत.यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खबरदारी म्हणून रुग्णालयातील बहुसंख्य डॉक्टरांसोबतच, परिचारिका, कर्मचारी रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक मास्कमध्येच दिसून येत आहे. मेडिकल प्रशासनही यावर जोर देत आहे. परंतु वापरण्यात आलेले मास्कची विल्हेवाट योग्य पद्धतीने होत नसल्याचे दिसून येत आहे. विशेषत: डॉक्टरांसह रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक वापरलेले मास्क कुठेही फेकून देत असल्याचे चित्र आहे. अपघात विभागाच्यासमोर, सायकल स्टॅण्डवर तर मास्कचा सडा पडलेला आहे. यामुळे स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, तर मास्कच्या वाढत्या कचऱ्याची समस्या मेडिकलसाठी डोकेदुखी ठरत आहे.(प्रतिनिधी)
आता स्वाईन फ्लूचा धोका ‘मास्क’मुळे
By admin | Updated: February 22, 2015 02:21 IST