१५ फेब्रुवारीपासून मनपाचा थकबाकीदारांना दणका : ४२३ कोटींपैकी ४९ कोटी थकबाकी जमा : ७ जानेवारीपर्यंत २१० कोटी वसूल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपाची मालमत्ताकराची ४२५ कोटींची थकबाकी आहे. तर, चालू वर्षाचे २५० कोटी असे ६७५ काेटी येणे आहे. ७ जानेवारीपर्यंत २१० कोटींची वसुली झाली. ३१ मार्चपर्यंत फार तर हा आकडा २६० कोटींपर्यंत जाईल. संपूर्ण थकबाकी वसूल करण्याचे आव्हान मोठे आहे. थकीत मालमत्ताकराची वसुली व्हावी, यासाठी महापालिका आयुक्तांनी १५ डिसेंबरपासून अभय योजना आणली. यातून ७ जानेवारीपर्यंत ४९ कोटींची वसुली झाली. थकबाकीचा विचार करता १२ टक्केच वसुली झाली आहे. १४ फेब्रुवारीपर्यंत ही योजना आहे. त्यानंतर १५ फेब्रुवारीपासून थकबाकीदांच्या मालमत्ता जप्त व लिलावात काढण्याची धडक मोहीम राबविली जाणार आहे.
अभय योजनेच्या माध्यमातून मनपा तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा होण्याची आशा निर्माण झाली होती. परंतु, अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. तीन लाख २५ मालमत्ताधारकांकडे अजूनही ३७६ कोटींची थकबाकी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत वसुली अधिक असली, तरी थकबाकी व चालू वर्षातील कर विचारात घेता वसुली कमी आहे.
थकबाकीदारांना अभय योजनेच्या माध्यमातून थकबाकी भरण्याची संधी दिली आहे. १४ फेब्रुवारीपर्यंत थकबाकी न भरल्यास १५ फेब्रुवारीपासून थकबाकीदारांच्या
मालमत्ता जप्त करून लिलावाची धडक मोहीम राबविली जाईल, अशी माहिती मनपाचे उपायुक्त (मालमत्ता) मिलिंद मेश्राम यांनी दिली.
...
जप्ती व लिलावाची यादी तयार
वारंवार आवाहन करूनही नागरिक मालमत्ताकर आणि पाणीपट्टीकर भरत नसल्याने मनपाने कडक कारवाई करायचे ठरवले आहे. त्यानुसार, प्रत्येक झोनमधील मोठे कर थकबाकीदार शोधून त्यांच्या जंगम मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली जाणार आहे. याची मनपाकडे यादी आहे. त्यांना यापूर्वी नोटिसा बजावल्या होत्या. १४ फेब्रुवारीपर्यंत करभरणा न केल्याने त्यांच्या जंगम मालमत्ता जप्त करून लिलावात काढल्या जातील.
...
७ जानेवारीपर्यंत ४९ कोटी वसूल
अभय योजनेच्या माध्यमातून १५ डिसेंबर ते ७ फेब्रुवारी या कालावधीत मालमत्ताकराची ४९ कोटींची थकबाकी वसूल झाली. यामुळे मनपाला थोडा दिलासा मिळाला. १५ फेब्रुवारीपर्यंत यात आणखी ५ ते १० कोटींची भर पडण्याची आशा आहे.
...
अशी आहे मालमत्ता व कराची मागणी
मनपा हद्दीतील मालमत्ता - ६,३५ ९९५
करनिर्धारण मंजूर मालमत्ता -६०७१५१
चालू आर्थिक वर्षाची मागणी -२५० कोटी
मालमत्ताकराची थकीत रक्कम -४२५ कोटी
एकूण मागणी - ६७५ कोटी
थकीत रकमेवरील व्याज १५७ कोटी
वसूल झालेली थकीत रक्कम -४९ कोटी.