नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वाडी येथील कुख्यात गुन्हेगार भारत कुलदीप सहारेच्या प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचा आदेश अवैध ठरवून रद्द केला. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांनी हा निर्णय दिला.
सहारेविरुद्ध २५ मार्च २०१८ रोजी शेवटचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर २९ जून २०१८ रोजी दोन गोपनीय साक्षीदारांचे बयान नोंदवण्यात आले व २१ जुलै २०१८ रोजी पोलीस आयुक्तांनी त्याला एक वर्षासाठी प्रतिबंधात्मक स्थानबद्ध करण्याचा आदेश जारी केला. गृह विभागाने १६ सप्टेंबर २०२० रोजी तो आदेश कायम केला. त्यामुळे २८ जुलै २०२० रोजी सहारेला अटक करण्यात आली. त्याविरुद्ध त्याने ॲड. राजेंद्र डागा यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सहारेविरुद्ध नोंदवण्यात आलेल्या अंतिम गुन्ह्याच्या आणि स्थानबद्धतेच्या आदेशाच्या तारखेमध्ये चार महिन्याचे अंतर आहे. त्याचे स्पष्टीकरण सरकारने कुठेच दिले नाही. त्यामुळे स्थानबद्धतेचा आदेश अवैध आहे, असे ॲड. डागा यांनी सांगितले. न्यायालयाला त्यात तथ्य आढळून आल्यामुळे तो आदेश रद्द करण्यात आला.