नागपूर : शिक्षण विभागाच्या सेस फंडातून मंजूर करण्यात आलेल्या सायकली शिक्षण सभापतींनी आपल्याच सर्कलमध्ये वळविल्याचा आरोप होत होता. पण जिल्ह्यातील सायकल मंजुरीची यादी जेव्हा हातात आली, त्यातून स्पष्ट झाले की, अध्यक्षासह समितीच्या विशिष्ट सदस्यांसह काँग्रेसच्या काही ज्येष्ठ सदस्यांचाही त्यात समावेश आहे. या सर्वांचे खापर सभापतींवर फुटले आणि त्यांनीही आपल्या सहकाऱ्यांचे बिंग फुटू नये म्हणून आरोप आपल्यावर घेतले. पण जिल्ह्यातील यादी विरोधकांच्या हाती लागल्याने यामागची गोम लक्षात आली.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून २० लाख रुपयांच्या २३८ सायकलीसाठी विद्यार्थ्यांची यादी मंजूर करण्यात आली होती. नागपूर पंचायत समिती अंतर्गत मंजूर झालेल्या ९७ सायकलची यादी जि.प. सदस्य सुभाष गुजरकर यांच्या हाती लागली. त्यात शिक्षण सभापती यांनी आपल्या सर्कलमध्ये जास्तीत जास्त सायकली मंजूर केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गुजरकर यांनी सभापतींना टार्गेट करून ताशेरे ओढले. दरम्यान, एकेक करता १३ ही तालुक्यात मंजूर झालेल्या सायकलची यादी समोर आली. त्यात जि.प. अध्यक्ष यांच्याही सर्कलमध्ये तालुक्यातून सर्वात जास्त सायकली वाटल्या. शिक्षण समितीतील काँग्रेसच्या तीन सदस्यांच्या सर्कलमध्येसुद्धा जास्त सायकली पळवून नेण्यात आल्या. काही विशिष्ट सदस्यांना सायकल मंजुरीत जास्त वाटा देण्यात आला. यात काँग्रेसचे जे अबोल सदस्य आहेत त्यांनाही डावलण्यात आले. यातील काहींच्या नशिबी एक-दोन आल्या तर काहींच्या सर्कलमध्ये एकही सायकल मिळाली नाही.
- बोलक्या सदस्यांची चलती
जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या काही बोलक्या सदस्यांची चलती आहे. हे बोलके सदस्य सभेमध्ये विनाकारण तोंड मारतात आणि अडवणुकीचे धोरण ठेवून आपली कामे करून घेतात, असा आरोप विरोधकांचा आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्याच पक्षातील काही शांत सदस्यांची चांगलीच गोची होते. सायकलचेच उदाहरण घेतले तर त्यांच्या वाट्याला काहीच आले नाही.
- आम्ही तर विरोधकच आहोत, सत्ताधाऱ्यांनी आपल्याच पक्षाच्या सदस्यांना डावलले आणि सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादीलाही ठेंगा दाखविला. काँग्रेसचे सदस्य ओरडत नाही. राष्ट्रवादीच्या सदस्यांना आवश्यकता नाही. पण आम्हाला वाटते आमच्यावर अन्याय झाला. त्यामुळे आम्ही ओरडणारच आहो.
व्यंकट कारेमोरे, उपगटनेते, भाजप