- विदर्भ साहित्य संघाची कार्यकारिणी : जुन्यांची वर्णी लागणार शतकमहोत्सव समितीत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २००५ सालापासून विदर्भ साहित्य संघाची कार्यकारिणी अविरोध स्थानापन्न होत आहे. विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ संपला असून, ८ फेब्रुवारी रोजी नव्या कार्यकारिणीची विधिवत घोषणा होणार आहे. त्याच अनुषंगाने गेल्या १६ वर्षांची ‘अविरोध’ परंपरा कायम राखण्याचे प्रयत्न विदर्भ साहित्य संघाकडून केले जात आहे.
१४ जानेवारी १९२३ रोजी अमरावती येथे स्थापन झालेल्या विदर्भ साहित्य संघाचा ९८वा वर्धापन दिन सोहळा नुकताच पार पडला. १४ जानेवारी २०२२ ते १४ जानेवारी २०२३ हे शतकमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. त्याच अनुषंगाने शतकमहोत्सवी समितीची स्थापना करण्यात आली असून, पुढील कार्यकारिणीच्या घोषणेनंतर या समितीची कार्यकारिणी निश्चित होणार आहे. विदर्भ साहित्य संघ आणि विदर्भातील साहित्य वर्तुळाच्या दृष्टीने शतकमहोत्सवी वर्ष अत्यंत महत्त्वाचे असल्याने पुढील कार्यकारिणी निवडणुकीद्वारे स्थानापन्न व्हावी, अशी कुणाचीच इच्छा नाही. त्याच अनुषंगाने अनेक नव्या सदस्यांची वर्णी कार्यकारिणीत लागावी आणि जुन्यांचा सन्मानही राखला जावा, असे प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने विद्यमान कार्यकारिणी इच्छुकांची पडताळणी करत आहेत. याचा अर्थ प्रकाश एदलाबादकर, नरेश सब्जीवाले, डॉ. श्रीपाद जोशी, विलास देशपांडे यांच्यासह आणखी काही नावे यंदा नव्या कार्यकारिणीत नसतील, अशी चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, जे कार्यकारिणीत नसतील त्यांना शतकमहोत्सवी समितीची धुरा दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
मनोहर म्हैसाळकरांच्या नेतृत्वातच होणार शतकीमहोत्सव
मनोहर म्हैसाळकर विद्यमान अध्यक्ष आहेत आणि २००५-०६ सालापासून त्यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणी बिनविरोध येत आहे. कार्यकारिणीतील सदस्यांचे फेरबदल होत राहिले तरी त्यात कुणीच खडा टाकल्याचे निदर्शनास आले नाही. मध्यंतरी म्हैसाळकरांनी दोन वेळा निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला. तसा अर्जही दिला होता. मात्र, म्हैसाळकरांऐवजी दुसऱ्या कुणाच्या हाती सत्ता गेली तर सभासदांमध्ये फूट पडेल आणि विदर्भ साहित्य संघाचे निर्मळ वातावरण संपुष्टात येईल, अशी भीती निर्माण झाली होती. अखेर सर्व सभासद आणि कार्यकारिणीने शतकमहोत्सव त्यांच्याच नेतृत्वात करण्याचा निर्णय घेतला होता. त्या एकमताचा विचार केल्यास यंदा होणारी निवडणूकीही बिनविरोधच पार पडणार, हे जवळपास स्पष्ट आहे.
वामनराव तेलंग झाले होते कार्याध्यक्ष
गेली निवडणूक परंपरेप्रमाणे बिनविरोध पार पडली. ठरल्याप्रमाणे म्हैसाळकर अध्यक्ष झाले. मात्र, व्यस्ततेचा कारभार वामनराव तेलंग यांच्या हाती सोपवून त्यांना कार्याध्यक्ष नेमण्यात आले होते. मात्र, गेल्याच वर्षी तेलंग यांचे निधन झाले आहे. त्यामुळे, यंदा कार्याध्यक्ष कोण होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
........