अशोक बाबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमाला नागपूर : साहित्य हे विचारांवर आधारित असते, मात्र आता तर विचारच संपवा, असा सूर ऐकायला येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध पुस्तकांमधून त्यांचे विचार लोकांसमोर मांडले आहेत. भारतीय संविधानदेखील त्यांनी अभ्यासलेल्या साहित्यातून जन्माला आले आहे. यामुळे त्यांच्या साहित्याला आंबेडकरी साहित्य न म्हणता रिपब्लिकन साहित्य म्हणावे, असे आवाहन भाषाशास्त्र व साहित्याचे अभ्यासक प्राचार्य डॉ. अशोक बाबर यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे दीक्षांत सभागृहात आयोजित दोन दिवसीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रोफेसर डॉ. प्रदीप आगलावे होते. कार्यक्रमाला वित्त व लेखा अधिकारी डॉ. अनिल हिरेखण उपस्थित होते. डॉ. बाबर म्हणाले, व्यक्तीच्या विचारांची जडणघडण लहान वयातच होते. आंबेडकरांचे विचार हे विद्यापीठात एम.ए. करताना शिकविले जातात, खरे तर ते पाचवी ते सातवी या वर्गांत शिकवायला हवेत. बाबासाहेबांच्या विचारांची सुुरुवात मार्क्सवादापासून होते व ते पुढे बुद्ध विचारापर्यंत जातात. बुद्धांचे विचार हे बायबलमध्ये आहेत, तेच कुराणात आहेत, तसेच ते आपल्या संविधानातही उतरले आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या आपण बुद्धांच्या विचारानुसार चालतोे. आंबेडकरी साहित्यातही ग्रामीण, दलित, आदिवासी, अशी विभागवारी केली जाते. हे चुकीचे आहे. हे साहित्य रिपब्लिकन साहित्य म्हणून ओळखले जावे. बाबासाहेबांचे विचार जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचे असतील तर त्यांनी लिहिलेले ‘पाकिस्तान आॅर पार्टिशन आॅफ इंडिया’ हे पुस्तक वाचायला हवे, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, रिपब्लिकन नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, ताराचंद्र खांडेकर प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी) वेगळ्या विदर्भाला पाठिंबा डॉ. अशोक बाबर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा दाखला देत विदर्भ राज्याच्या निर्मितीला पाठिंबा दर्शविला. ते म्हणाले, मोठ्या झाडाच्या छायेत असलेल्या लहान झाडाची वाढ का होत नाही या प्रश्नाचे गूढ एका मुलीला उकलता आले नाही. यावर जीवशास्त्राच्या तज्ज्ञाने मोठ्या झाडामुळे सूर्यकिरणे लहान झाडापर्यंत पोहचत नसल्याने वाढ होत नाही, असे सांगून महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा झाल्यास त्याचा विकास होईल, असे मत व्यक्त केले. महाराष्ट्राची तीन राज्ये करावीत असा डॉ. आंबेडकरांचा विचार होता, हेही त्यांनी आवर्जून सांगितले.
आंबेडकरी नव्हे, रिपब्लिकन साहित्य म्हणा
By admin | Updated: March 4, 2017 02:04 IST