आशिष साैदागर
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : मृग नक्षत्राला सुरुवात झाली असून, समाधानकारक पाऊस काेसळताच शेतकरी पेरणीला सुरुवात करतील; मात्र कळमेश्वर तालुक्यातील राष्ट्रीयीकृत व नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांनी अद्यापही पीककर्ज वाटपाला सुरुवात केली नाही. त्यामुळे पीककर्ज वाटपाचा नेमका मुहूर्त काेणता, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
यावर्षी एकीकडे काेराेना संक्रमण व मागील हंगामातील नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच कृषी निविष्ठांच्या किमतीसह वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे. दुसरीकडे तालुक्यातील राष्ट्रीयीकृत व नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखांना पीककर्ज वाटपात अप्रत्यक्षरित्या असहकार केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करीत पीककर्जाची उचल करण्यासाठी बँक शाखा व शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
तालुक्यातील १५ ते २० टक्के शेतकऱ्यांनीच बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठांची खरेदी केल्याची माहिती विविध कृषी सेवा केंद्र मालकांनी दिली. जवळ पैसा नसल्याने कृषी निविष्ठांची खरेदी करायची कशी, असा प्रश्न काही शेतकऱ्यांनी उपस्थित केला असूनही काहींनी उधारीत खरेदी केल्याचे सांगितले. काेराेना संक्रमणामुळे दुकानदार उधारीत बियाणे व खते द्यायला तयार नसल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. पीककर्ज मिळावे म्हणून आपण मेच्या शेवटच्या आठवड्यापासून बँकेचे खेटे घालत आहेत; मात्र बँक अधिकारी कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. शिवाय, लाेकप्रतिनिधी काेराेनाचे कारण सांगून गप्प बसले आहेत, असेही काही शेतकऱ्यांनी सांगितले. परिणामी, प्रशासनाने ही समस्या तातडीने साेडवून पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.
...
८.५५ काेटी रुपयांचे कर्जवाटप
मागील वर्षी जून महिन्यात कळमेश्वर तालुक्यातील २,६३२ शेतकऱ्यांना २७ काेटी ३५ लाख ७६ हजार रुपयांचे पीककर्ज देण्यात आले हाेते. चालू खरीप हंगामात कळमेश्वर तालुक्यातील विविध बँकांनी साेमवार (दि. ७)पर्यंत केवळ ६६७ नियमित ६७ नवीन अशा एकूण ७३४ शेतकऱ्यांना ८ काेटी ५५ लाख ३४ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली.
...
तारण ठेवा अन् कर्ज घ्या
बँक अधिकारी काेणती ना काेणती कारणे सांगून शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास नकार देत आहेत. याला राष्ट्रीयीकृत व नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांही अपवाद नाहीत. बँक अधिकारी त्यांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट व केलेले कर्जवाटप याचीही माहिती देण्यास नकार देत आहेत. खासगी बँकांनी तर शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. काही बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी शेती, भूखंड अथवा साेने तारण ठेवण्याची सूचना केली आहे.
...
तालुक्यात सध्या जवळपास ३० टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. आता कर्ज वाटप प्रक्रियेला वेग येईल. कोरोनामुळे १५ टक्के कर्मचारी उपस्थित असल्याने कर्ज मंजुरी व वाटपाची गती संथ होती. शासनाने लाॅकडाऊन शिथिल केल्याने बँकांना पीककर्ज वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना पीककर्जासंदर्भात काेणत्याही अडचणी आल्यास त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा.
- एस. आर. आगरकर,
सहायक निबंधक, कळमेश्वर.