नागपूर : काटोल मार्गावरील मुलींचे बालगृह बंद करण्याच्या विरोधात दाखल जनहित याचिका उच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई आणि न्या. व्ही. एम. देशपांडे यांच्या खंडपीठाने तीन आठवड्यानंतर सुनावणीस ठेवली. ही याचिका भारतीय स्त्री शक्तीच्या हर्षदा पुरेकर यांनी दाखल केली आहे. न्यायालयाने तत्त्व प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मीरा खडक्कार यांना मध्यस्ती करण्यास आणि मूळ याचिकेच्या कार्यवाहीत सहभागी होण्यास परवानगी दिली आहे. प्रतिवादी महिला व बालविकास विभागाचे सचिव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांना बाल गृहातील मुली अन्यत्र हलविण्यास मज्जाव करण्यात यावा, विविध ठिकाणी स्थानांतरित करण्यात आलेल्या मुलींना परत आणण्यात यावे, काटोल मार्गावरील बालगृह बंद करण्यासही मज्जाव करण्यात यावा, असे निर्देश या याचिकेद्वारे मागण्यात आले आहेत. या संस्थेला अर्थिक साहाय्य म्हणून जिल्हा अधिकाऱ्यांनी निधी वितरित करावा, अशी प्रार्थनाही याचिकेद्वारे करण्यात आली. येथील मुली ८ ते १३ वयोगटातील आहेत. कोणत्याही पूर्वसूचनेविना बालगृहाकडून श्रद्धानंद अनाथालयाला असे सूचित करण्यात आले की, उपासमारीची शक्यता असल्याने आम्ही काही मुली आपणाकडे स्थानांतरित करीत आहोत. खडक्कार आणि अन्य दोन कार्यकर्त्यांनी या बालगृहाला भेट दिली. त्यांना या ठिकाणी काही अनियमितता आढळून आल्या. त्या त्यांना न्यायालयात सादर करावयाच्या आहेत. न्यायालयात याचिकाकर्त्या हर्षदा पुरेकर यांच्यावतीने अॅड. पद्मा चांदेकर, मध्यस्ताच्यावतीने अॅड. अंजली जोशी तर सरकारच्यावतीने मुख्य सरकारी वकील भारती डांगरे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
बालगृह बंद करण्यास एनजीओचा विरोध
By admin | Updated: November 6, 2014 02:44 IST