वसीम कुरैशी
नागपूर : सिव्हिल लाईन्स येथील जुनी हायकोर्ट इमारत संवर्धनाकरिता तिसऱ्यांदा टेंडर जारी केले जाणार आहे. ही इमारत जीर्ण झाली असून तिचे अस्तित्व वेळूफाटे लावून टिकविणे सुरू असल्याची बातमी लोकमतने ७ डिसेंबर २०२० रोजी प्रकाशित केली होती. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने त्याची दखल घेऊन हे टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या या इमारतीत पुरातत्त्व विभागाचे कार्यालय कार्यरत आहे. दोन वर्षांपूर्वी इमारतीच्या देखभाल व दुरुस्तीसाठी ७८ लाख रुपयाचे टेंडर जारी करण्यात आले होते. परंतु, एकाही कंत्राटदाराने या कामात रस दाखविला नाही. त्यानंतर चार महिन्यांनी दुसऱ्यांदा टेंडर काढण्यात आले. तेव्हाही कंत्राटदार आले नाही. गेल्या वर्षी पावसाळ्यात इमारतीचा पुढचा भाग व दुसऱ्या माळ्यावरील काही भाग खचला. तळमाळ्याची छत कमकुवत झाली. त्यामुळे छताला वेळूफाट्यांचा आधार देण्यात आला.
------------
कंत्राटदारांना या कामात का रस नाही
सूत्रांच्या माहितीनुसार, स्मारकांच्या देखभाल व दुरुस्तीकरिता कडक नियम असून हे काम करण्यासाठी तज्ज्ञ अभियंते व कामगारांची गरज असते. तसेच, कंत्राटदाराला कोणत्याही स्मारकाच्या देखभाल व दुरुस्तीचा तीन वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे. नागपूरमध्ये अशा कामाकरिता एकही कंत्राटदार नाही. त्यामुळे अजंता एलोरा, बीबी का मकबरा इत्यादी स्मारकांची देखभाल करणाऱ्या कंत्राटदारांशी संपर्क साधण्यात आला होता. परंतु, ते तेवढ्या लांबून येण्यास तयार नसल्याचे दिसून येते.