नागपूर : गोधनी रेल्वे परिसरातील नमो बारच्या विरोधात सोमवारी परिसरातील महिलांच्या भावनांचा चांगलाच भडका उडाला. दरम्यान शेकडो आंदोनलकर्त्यांनी बारवर हल्लाबोल चढवून तोडफोड केली. या बार विरोधात मागील काही दिवसांपासून धरणे-आंदोलन सुरू आहे. परंतु सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास परिसरातील काही महिलांनी बारवर जोरदार दगडफेक सुरू केली. यात बारचा फलक व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड झाली. त्याचवेळी काही तरुणांनी रस्त्यावर टायर जाळून विरोध प्रदर्शन सुरू केले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे लगेच पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी आंदोलनकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलनकर्त्यांनी हटण्यास नकार दिला. उलट काही आंदोलनकर्त्यांनी बारमालकाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी लगेच बारमालकाला सुरक्षित बाहेर काढले. यानंतर आ. समीर मेघे व काही आंदोलनकर्त्यांनी स्वत:ला अटक करू न घेतली. मागील महिन्यापासून या बारच्या विरोधात स्थानिक महिला कृती समितीने एल्गार पुकारला आहे. दरम्यान स्वाक्षरी अभियान राबवून एक हजार हस्ताक्षरांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. शिवाय गोधनी ग्रामपंचायतीनेसुद्धा या बार अॅण्ड रेस्टॉरन्टला परवानगी नाकारल्याची माहिती आहे. सोबतच परिसरातील नागरिकांनी पोलीस आयुक्त, उत्पादन शुल्क विभाग व कोराडी पोलीस स्टेशनला निवेदन सादर करू न या बारवर आक्षेप नोंदविण्यात होता. बारला मंत्रालयस्तरावरून परवानगी मिळाल्याने जिल्हा प्रशासनाने कारवाई केली नाही. मात्र आज चांगलाच भडका उडाला. (प्रतिनिधी)
नमो बारवर महिलांचा हल्लाबोल!
By admin | Updated: October 20, 2015 03:40 IST