नागपूर: जम्मू-काश्मीरमध्ये यंदा पुराने कहर केला व अनेक गावांमध्ये दुरावस्था निर्माण झाली आहे. बऱ्याच ठिकाणी पिण्याचे शुद्ध पाणीदेखील मिळणे कठीण झाले आहे. हीच बाब लक्षात घेता ‘सीएसआयआर-नीरी’तर्फे पुरग्रस्त भागात मदतीचा हात देण्यात आला आहे. ‘नीरी’कडून विविध भागांमध्ये अडीचशे जल शुद्धीकरण यंत्रप्रणाली स्थापित करण्यात आल्या आहेत.
‘नीरी’तर्फे ५० सामुदायिक पातळीवरील ‘नीरी-झार’ या प्रणाली तर २०० घरगुती जल शुद्धीकरण फिल्टर्स लावण्यात येत आहेत. पहिली बॅच कठुआ येथे पोहोचविण्यात आली व तेथून विविध भागात हे युनिट्स गेले. याशिवाय अतिरिक्त युनिट्स तयार करून तेदेखील पाठविण्यावर भर देण्यात येत आहे.
माननीय केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री तसेच सीएसआयआरचे उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र सिंह यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात आली. हे जल शुद्धीकरण युनिट्स जम्मू-काश्मीरमधील गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘सीएसआयआर-नीरी’, ‘सीएसआयआर-आयआयआयएम-जम्मू’ व ‘सीएसआयआर-टास्क फोर्स कमिटी’कडून समन्वय साधण्यात येत आहे. पूरग्रस्त भागात पाण्यांचे स्त्रोत प्रदुषित झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. या युनिट्समुळे नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सीएसआयआर-नीरीचे शास्त्रज्ञ डॉ. अतुल मालधुरे, डॉ. कुमार अमृत, प्रतीक धर द्विवेदी आणि डॉ. भोलू राम यादव यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. प्रकल्प सहयोगी डॉ. सचिन पाटील आणि ऋषिकेश लोखंडे यांच्यासह या पथकाने जम्मूमध्ये स्थानिक पातळीवर मिळवलेल्या साहित्याचा वापर करून २५० शुद्धीकरण युनिट्स तयार केले. प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. रमन शर्मा आणि मुख्य शास्त्रज्ञ डॉ. एस.के. गोयल यांनी सामग्री खरेदीचे निरीक्षण केले आणि सीएसआयआर-नीरी दिल्ली झोनल सेंटरकडून जलद वितरणाची सुविधा उपलब्ध करून दिली.
काय आहे ‘नीरी-झार’ प्रणाली
जल शुद्धीकरणाची ‘नीरी-झार’ ही प्रणाली गुरुत्वाकर्षणावर आधारित, शून्य-ऊर्जा जल शुद्धीकरण प्रणाली आहे. यात वीजेची गरज नसते व यामाध्यमातून पाण्याचा गढूळपणा, बॅक्टेरिया आणि रोगजनकांना काढणे शक्य होते. अतिशय लहान, पोर्टेबल आणि वापरकर्ता-अनुकूल असलेल्या या प्रणालीचा देशातील अनेक आपत्तीग्रस्त तसेच दुर्गम भागातव वापर करण्यात आला आहे.