नागपूर : विदर्भातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. विदर्भाची शान असलेले नागपूर फ्लाइंग क्लब येत्या ८ मेपर्यंत कार्यान्वित केले जाईल, अशी ग्वाही क्लबचे अध्यक्ष व विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे. यासंदर्भात त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
नागपूर फ्लाइंग क्लब कार्यान्वित करण्यासाठी दिलेल्या विविध आदेशांचे पालन झाले नसल्याची बाब लक्षात घेता उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांना फटकारून कायदेशीर कारवाई करण्याची तंबी दिली होती. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी विस्तृत प्रतिज्ञापत्र दाखल करून नागपूर फ्लाइंग क्लब कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची माहिती दिली. त्यानुसार, क्लब कार्यान्वित करण्यासाठी डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनकडून क्लबमधील चार विमानांचे एअरवर्थिनेस रिव्ह्यू सर्टिफिकेट मिळवणे, फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनच्या मान्यतेचे नूतनीकरण सर्टिफिकेट प्राप्त करणे आणि रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. एअरवर्थिनेस रिव्ह्यू सर्टिफिकेट १५ मार्च २०२१ तर फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनच्या मान्यतेचे नूतनीकरण सर्टिफिकेट २२ एप्रिल २०२१ पर्यंत मिळेल, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले आहे.
---------------
ही पदे रिक्त आहेत
क्लबमधील डेप्युटी चीफ फ्लाइंग इन्स्ट्रक्टर, चीफ ग्राउंड इन्स्ट्रक्टर, सहायक अभियंता, स्टोर इन्चार्ज व सहायक फ्लाइट इन्स्ट्रक्टरचे प्रत्येकी एक तर, तांत्रिक अधिकारी, तंत्रज्ञ व ग्राउंड इन्स्ट्रक्टरची प्रत्येकी दोन पदे रिक्त आहेत. ही पदे १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत भरली जातील, अशी माहिती विभागीय आयुक्तांनी दिली आहे.
--------------
पुढील सुनावणी २४ फेब्रुवारीला
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय नितीन जामदार व अनिल किलोर यांनी विभागीय आयुक्तांचे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन पुढे होणाऱ्या कामाचा आढावा घेण्यासाठी या प्रकरणावर येत्या २४ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. यासंदर्भात न्यायालयात सुमेधा घटाटे यांची जनहित याचिका प्रलंबित आहे.