नागपूर : जीवघेण्या स्पर्धेच्या या युगात शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाकडे युवकांचा कल वाढला आहे. विशेषत: आपल्या नागपूरमध्ये बुद्ध तत्त्वज्ञान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे विद्यापीठातील अनेक विषयांच्या वर्गाला विद्यार्थ्यांचे दर्शन दुर्लभ झाले असताना बुद्धिस्ट स्टडीचे वर्ग हाऊसफुल्ल आहेत. यातही विदेशातील विशेषत: बुद्ध राष्ट्रातील विद्यार्थीसुद्धा बुद्ध तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी नागपूरला पसंती देत असून नागपूर हे बुद्ध तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाचे जागतिक केंद्र बनले आहे. बौद्ध राष्ट्रातील लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दीक्षाभूमी यांच्याबद्दल असलेले विशेष आकर्षण हे यासाठी मुख्य कारण ठरले आहे, हे विशेष. विद्यापीठाच्या स्तरावर विचार केला असता महाराष्ट्रात बुद्धिस्ट स्टडीचा अभ्यासक्रम सर्वप्रथम नागपूर विद्यापीठात सुरू झाला. पुणे आणि औरंगाबाद विद्यापीठातही हे विषय शिकविले जातात. बुद्ध तत्त्वज्ञान शिकवतांना डॉ. आंबेडकरांचे विचारही शिकविले जातात. नागपुरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत पाली प्राकृत विभाग आणि बुद्धिस्ट स्टडीसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग आणि डॉ. आंबेडकर अध्यासन आदी बौद्ध तत्त्वज्ञानाशी संबंधित विभाग आहेत. हे सर्व विभाग दरवर्षी हाऊसफुल्ल असतात हे विशेष. नागपुरात विद्यापीठांतर्गत बुद्धिस्ट स्टडी हा पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविला जातो. या विभागाला कधीही विद्यार्थ्यांनी कमतरता जाणवली नाही, उलट हाऊसफुल्लचा बोर्ड लागत असल्याने अनेकजणांना पुढील शैक्षणिक सत्राची वाट पाहावी लागते, असे चित्र आहे. थायलंड, म्यानमार, श्रीलंका या राष्ट्रांमधून खास बुद्ध तत्त्वज्ञान शिकण्यासाठी भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. दिल्ली, बिहार येथील विद्यापीठांमध्ये आजवर विदेशातील विद्यार्थी प्रवेश घेत असत. परंतु मागील काही वर्षांपासून बुद्धिस्ट राष्ट्रातील विद्यार्थ्यांनी बुद्ध तत्त्वज्ञान शिकण्यासाठी नागपूरला पसंती दर्शविली आहे. देशविदेशातील विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता लवकरच यात एमफील सुद्धा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
नागपूर बनले बुद्ध तत्त्वज्ञानाचे केंद्र
By admin | Updated: May 4, 2015 02:24 IST