नागपूर : व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या नागलवाडी रेंज, वरपनी बीटमध्ये मंगळवारी एका वाघाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. या वाघाचे चारही पंजे कापलेले होते. शरीरावरील केसही पूर्ण गळालेले होते. त्यावरून ही घटना किमान आठवडाभरापूर्वीची असावी, तसेच ही व्याघ्रहत्या असावी, असा संशय व्यक्त होत आहे. या घटनेमुळे वनक्षेत्रात खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे हा वाघ पूर्ण वाढ झालेला आहे. त्यामुळे शंकेला बराच वाव असल्याचे वनविभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे. हे घटनास्थळ एफडीसीएमअंतर्गत येणाऱ्या वरपनी बिटमध्ये येते. या बिटमधील रिसाळा रेंज परिसरात गावातील काही महिला मंगळवारी दुपारी जंगलात सरपणासाठी गेल्या असता एक वाघ मृतावस्थेत असल्याचे आढळले. त्यांनी गावात माहिती दिल्यावर पोलीस पाटलाने गस्तीवरील वनरक्षक शृंगाळपुतळे यांना कळविले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आठवडाभरापूर्वी ही घटना घडली असावी, असा वनाधिकाऱ्यांचा अंदाज आहे. त्याचे शरीर कुजलेल्या स्थितीत होते, तसेच संपूर्ण केस गळून पडले होते.
वन विभागाने कळविल्यानुसार, एनटीसीएच्या दिशानिर्देशानुसार, बुधवारी (२४ मार्च) वाघाचे शवविच्छेदन केले जाणार आहे. त्यानंतर वाघाच्या मृत्यूसंदर्भातील माहिती हाती येण्याची शक्यता आहे.
१५ दिवसांपूर्वी टी-१ वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह कऱ्हांडलाच्या जंगलात आढळला होता. तीन दिवसांपूर्वी दुसऱ्या बछड्याचाही मृतदेह आढळला होता. तिसऱ्याचा अद्याप ठावठिकाणा नाही. ही घटना ताजी असतानाच आता पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत नागलवाडी रेंजमध्ये पूर्ण वाढ झालेल्या वाघाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला आहे. यामुळे जिल्ह्यातील वाघांवरच्या संकटाबद्दल व्याघ्रप्रेमींमधून चिंता व्यक्त होत आहे.
...
तपासाचे आव्हान
या वाघाचे चारही पंजे कापलेल्या स्थितीत होते. अंगावरचे मांस सडलेले व केस गळालेले असल्याने मिशांसंदर्भात अंदाज आला नाही. ज्या पद्धतीने वाघ पडलेला होता, त्यावरून त्याची हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, तपासानंतरच सत्य कळणार आहे. आठवडाभरानंतर हा प्रकार विलंबाने उघडकीस आल्यामुळे गस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
...