लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - प्रेम प्रकरणातून एकाने दुसऱ्या तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सकाळी ८.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. किशोर नंदनवार असे मृताचे नाव आहे तर, आरोपीचे नाव शेरखान इस्माईल खान आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी शेरखान याच्या मानलेल्या बहिणीसोबत सलगी करण्याचे किशोर प्रयत्न करीत होता. वारंवार बोलण्या भेटण्याचा तो प्रयत्न करीत असल्याचे कळाल्याने आरोपीने किशोर याला काही दिवसांपूर्वी वॉर्निंगही दिली होती. मात्र, त्याकडे किशोरने दुर्लक्ष केल्याने आरोपीचा किशोरसोबत वाद झाला होता. या पार्श्वभूमीवर, आरोपीने किशोरला फोन करून बोलायचे आहे, असे सांगितले आणि त्याला माजरी रेल्वे अंडरब्रीजजवळ बोलवून घेतले. सकाळी ८.३० च्या सुमारास किशोर तेथे पोहचला. प्रेम प्रकरणावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. आरोपीने जवळचा चाकू काढून किशोरला भोसकणे सुरू केले. जीवाच्या धाकाने किशोर पळत सुटला आणि बाजूच्या डबेवाल्याच्या घरासमोर जाऊन कोसळला. या घटनेमुळे नागरिकात एकच दहशत निर्माण झाली. मिळालेल्या माहितीवरून यशोधरानगरचे पोलीस उपनिरीक्षक बहादुरे, उपनिरीक्षक भार्गव आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहचले. तत्पूर्वीच नागरिकांनी जखमी किशोरला मेयोत नेले होते. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, आरोपीचे नाव पत्ता माहीत पडल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे धाव घेतली. आरोपी शेरखान पोलिसांना पाहून पळू लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला जेरबंद केले.
दोन दिवसात पुनरावृत्ती
प्रेम प्रकरणातून हजारीपहाडमध्ये गुरुवारी दुहेरी हत्याकांड घडले. या थरारकांडाच्या वृत्ताची शाई वाळायची असताना पुन्हा यशोधरा नगरातही हत्येची घटना घडल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.