नागपूर : महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने हायटेक यंत्रणेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात तीन शाळा डिजिटल करण्यात आलेल्या आहेत. यातील जयताळा येथील माध्यमिक शाळेतील डिजिटल कक्ष सुरू करण्यात आला आहे. आठवडाभरात डिप्टी सिग्नल येथील संजयनगर तसेच सानेगुरुजी शाळांतील डिजिटल कक्ष सुरू केला जाणार आहे. नागपूर महापालिकेच्या १८२ शाळा आहेत. यातील ज्या शाळांतील पटसंख्या अधिक आहे, अशा शाळांत टप्प्याटप्प्याने डिजिटल शिक्षणाला सुरुवात केली जाणार आहे. तीन शाळांतील कक्ष सज्ज झालेले आहेत. लवकरच पुन्हा १५ शाळांत डिजिटल कक्ष निर्माण करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. डिजिटल कक्ष चालविण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची गरज आहे. त्यामुळे शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची मोहीम राबविली जात आहे. जयताळा शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. डिजिटल कक्षाची क्षमता व शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊ न नियोजन केले जात आहे. डिजिटल शिक्षणामुळे महापालिकेच्या शाळांतील पटसंख्या कमी होण्याला आळा बसणार आहे. (प्रतिनिधी)
मनपा शाळा होताहेत डिजिटल
By admin | Updated: September 26, 2016 03:00 IST