लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या दहापैकी आठ झोन सभापतिपदी महिला नगसेविकांची निवड निश्चित आहे. लक्ष्मीनगर ते लकडगंज झोनमध्ये भाजपशिवाय इतर दुसऱ्या पक्षाने अर्ज सादर केला नसल्यामुळे भाजप उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित आहे, तर आसीनगर व मंगळवारी झोनमध्ये निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. मंगळवारी १६ फेब्रुवारीला पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या उपस्थितीत निवडणूक होत आहे. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांनी उमेदवारी अर्ज स्वीकारले. यावेळी अधीक्षक दत्तात्रय डहाके, वरिष्ठ लिपिक सुरेश शिवणकर, राजस्व निरीक्षक विलास धुर्वे उपस्थित होते.
संख्याबळाचा विचार करता ८ झोनमध्ये भाजप उमेदवारांना आव्हान नाही. आसीनगरमध्ये गेल्यावेळी बसपाचा सभापती निवडूनआला होता. परंतु यावेळी बसपाचे नगरसेवक मोहम्मद जमाल यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. वास्तविक बसपाच्या उमेदवार वंदना चांदेकर आहेत. भाजपने भाग्यश्री कानतोडे यांना उमेदवारी दिली आहे. अशा परिस्थितीत जमाल यांच्या बंडखोरीमुळे बसपा उमेदवारांची उमेदवारी संकटात आली आहे. मोहम्मद जमाल यांचा उमेदवारी अर्ज सादर करताता काँग्रेसचे परसराम मानवटकर, दिनेश यादव उपस्थित होते. यामुळे त्यांना काँग्रेसचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. आसीनगर झोनमध्ये १६ सदस्य असून, यात बसपाचे ७, काँग्रेसचे ५ आणि भाजप ३ नगरसेवक आहेत. जमाल यांच्या उमेदवारीमुळे बसपाचे एक मत कमी झाले आहे. अशा परिस्थितीत तीन मते असलेली भाजप किंगमेकरची भूमिका बजावू शकते. भाजपने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यास जमाल यांचा विजय निश्चित आहे.
मंगळवारी झोनमध्ये गेल्यावेळी काँग्रेसच्या गार्गी चोप्रा यांना भाजपने पाठिंबा देऊन सभापती केले होते. यावेळी काँग्रेसच्या साक्षी राऊत व भाजपच्या प्रमिला मथरानी उमेदवार आहेत. येथे भाजपचे ८, बसपाचे ३, तर काँग्रेसचे पाच नगरसेवक आहेत. त्यामुळे येथे निवडणूक होत आहे.
नव्यांना संधी
झोन सभापतींना मिनी महापौर संबोधले जाते. परंतु गेल्या दीड वर्षात झोन सभापतींची कामे झाली नाही. यामुळे ज्येष्ठ नगरसेवक या पदासाठी इच्छुक नव्हते. ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्तही प्रकाशित केले. ते सत्य ठरले. उमेदवारी अर्जावरून हे स्पष्ट झाले. सतरंजीपुरा झोनमध्ये सभापती अभिरूची राजगिरे यांना पुन्हा भाजपने उमेदवारी दिली आहे.
झोन उमेदवार
लक्ष्मीनगर- पल्लवी शामकुळे (भाजप)
धरमपेठ -सुनील हिरणवार (भाजप)
हनुमाननगर- कल्पना कुंभलकर(भाजप)
धंतोली -वंदना भगत (भाजप)
नेहरूनगर- स्नेहल बिहारे (भाजप)
गांधीबाग -श्रद्धा पाठक (भाजप)
सतरंजीपुरा -अभिरूची राजगिरे (भाजप)
लकडगंज -मनीषा अतकरे (भाजप)
आसीनगर- भाग्यश्री कानतोडे (भाजपा)
वंदना चांदेकर (बसपा)
मोहम्मद जमाल (अपक्ष )
मंगळवारी - प्रमिला मथरानी (भाजप)
साक्षी राऊत (काँग्रेस)