संजय गणाेरकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
माेहपा : उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत असतानाच मोहपा (ता. कळमेश्वर) शहराच्या अर्ध्या भागाला काही दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे. सध्या शहराला दोन जलाशयातून पाणीपुरवठा होत असून, खुमारी जलाशयातील पाण्यावर जलशुद्धीकरण प्रक्रिया व्यवस्थित होत नसल्याने शहराच्या उत्तरेकडील भागात राहणाऱ्या नागरिकांना गढूळ व गाळमिश्रित पाणी मिळत आहे. हा गंभीर प्रकार असूनही पालिका प्रशासन आणि पदाधिकारी याबाबत सजग नाही, असा आराेप नागरिकांनी केला आहे.
माेहपा शहराला मधुगंगा आणि खुमारी या दाेन जलाशयातून पाणीपुरवठा केला जाताे. पाण्याचे व्यवस्थित वितरण व्हावे म्हणून शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दीड लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम केले आहे. ही सर्वात जुनी पाण्याची टाकी असून, त्या टाकीचे जलशुद्धीकरण संयंत्र जलाशयाच्या पूर्वेला म्हणजेच म्हसेपठार शिवारात आहे. या टाकीतून अर्ध्या शहराला म्हणजेच मधुगंगा नदीच्या दक्षिणेकडील भागात राहणाऱ्या नागरिकांना पाणीपुरवठा होतो.
खुमारी जलाशयातून शहराच्या उत्तरेकडील भागात राहणाऱ्या नागरिकांना पाणीपुरवठा केला जाताे. त्यासाठी पालिकेने गळबर्डी भागात एक लाख लिटर व ५० हजार लिटर क्षमतेच्या दोन टाक्या तसेच जलशुद्धीकरण संयंत्र तयार केले आहे. या जलशुद्धीकरण संयंत्रातील तांत्रिक मीडिया (लाल बारीक रेती आणि दगड) कालबाह्य झाले आहेत. या मीडियाची वारंवार तपासणी करून त्यावर लक्ष ठेवणे, गरज भासल्यास मिडिया अंशतः किंवा पूर्णतः बदलणे, आवश्यक कार्यवाही करून वरिष्ठांना अवगत करणे, हे पालिकेच्या पाणीपुरवठा अभियंत्याची कामे आहेत. यात हयगय होत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व बाबींवर प्रभारी मुख्यधिकारी आणि पालिका पदाधिकारी यांचे नियंत्रण आणि वचक नसल्याने गेल्या आठवड्यापासून शहराला गढूळ आणि गाळ मिश्रित पाणीपुरवठा होत आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
...
तांत्रिक मीडिया मागवण्यात आला
या जलशुद्धीकरण केंद्रासाठी लागणारा तांत्रिक मीडिया लाखांदूर (जिल्हा भंडारा) येथून मागविण्यात आला आहे. येत्या एक - दोन दिवसात हा मीडिया प्राप्त होईल. त्यानंतर दोन दिवसात जलशुद्धीकरण यंत्रणा व्यवस्थित सुरू होईल, अशी माहिती नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता शैलेश बेलोकर यांनी दिली. हा मीडिया चार ते पाच वर्षापूर्वीपासून बदलविण्यात आला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. याकडे प्रशासनाने लक्ष का दिले नाही, हे अनाकलनीय आहे.
...
वापराविना टाक्या
नगरपालिकेने शहरातील झोपडपट्टी भागात विहिरीचे खाेदकाम व बांधकाम करून पाण्याच्या नवीन टाकीची निर्मिती केली. डॉ. आंबेडकर चौकात जुन्या टाकीजवळ पुन्हा ५० लिटर क्षमतेच्या टाकीचे बांधकाम केले. या दोन्ही टाक्यांचा पालिकेने कधीच वापर केला नाही. शिवाय, सावनेर मार्गालगत विहिरीचे खोदकाम करून पाईपलाईन टाकली. या विहिरीतील पाण्याचा व पाईपलाईचाही काही उपयाेग केला जात नाही. पाणीपुरवठ्यावर अवाढव्य खर्च केला जात असतानाही शहरवासीयांना गढूळ पाण्यावर तहान शमवावी लागते.