नागपूर : थकीत वीज देयकाचा भरणा करावा यासाठी वारंवार आठवण करून दिल्यानंतरही रक्कम भरली नाही म्हणून वीजवितरणने वीजपुरवठा खंडित केल्यामुळे ग्राहकाच्या नातेवाइकाने सहायक अभियंत्यास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोनेगाव परिसरात शनिवारी संध्याकाळी घडली. याप्रकरणी महावितरणकडून सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
१३ मार्च रोजी महावितरणच्या सोमलवाडा शाखा कार्यालयाचे सहायक अभियंता संजीव भक्ते हे सोनेगाव तलाव परिसरात प्रकाश निकम, अशोक पेठे, रितेश कोहळे, राहुल यादव, सुजित पाठक या आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन थकबाकीची वसुली करीत होते. तसेच वीज देयकाची रक्कम न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करीत होते. परिसरातील सयद अमीन, चांदपाशा अमीन सयद या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केल्यावर चर्चा करून पुढील कामाचे नियोजन करीत होते. इतक्यात झिनिया गाडीतून ( क्र. एमएच ४० केआर ३४५१) आलेल्या दोन इसमांनी सहायक अभियंता भक्ते यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच मारहाण करण्याच्या हेतूने अंगावर धावून गेले. परंतु महावितरणचे ६-७ कर्मचारी एकत्रित असल्याने मारहाण करता आली नाही. या घटनेनंतर सहायक अभियंता भक्ते यांनी थेट सोनेगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.
याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भादंवि कलम ३५३, २९४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. या घटनेचे महावितरणकडून छायाचित्रण करण्यात आले असून, या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्याची विनंती महावितरणने पोलिसांना केली आहे. महावितरण कर्मचाऱ्यावर हल्ला करणे हे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आहे. अशा प्रकरणात दोषी आरोपीस कारावास आणि आर्थिक दंडाची तरतूद आहे, याकडे महावितरणने लक्ष वेधले आहे.