नागपूर : राज्य शासनाने ‘एमपीएससी’च्या परीक्षेचे वेळापत्रक बदलल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. आघाडी सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत चालू असलेला खेळ लगेच बंद करून परीक्षा १४ मार्चलाच घ्याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व वरील मुद्दे मांडले.
या वेळी भाजप शहराध्यक्ष आ. प्रवीण गटके, भाजयुमो शहराध्यक्ष पारेंद्र पटले, प्रदेश सचिव कल्याण देशपांडे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक राम वाघ आणि नितीन मुरमे प्रामुख्याने उपस्थित होते. २१ तारखेला परीक्षा आयोजित होत असल्याने अनेकांचे नियोजन बिघडले आहे. विद्यार्थ्यांनाच ‘कोरोना’ होतो व इतरांना होत नाही, अशी आघाडी शासनाची भूमिका आहे, असा विद्यार्थ्यांचा सूर होता. या वेळी यश सातपुते, अमर धरमारे, सन्नी राऊत, बादल राऊत, शेखर कुर्यवंशी, पंकज सोनकर हेदेखील उपस्थित होते.