नागपूर : केंद्र व राज्य सरकारच्या योजना व ग्रामस्थांचा सहभाग यातून पुढील पाच वर्षात जिल्ह्यातील गावागावात २४ तास पाणी उपलब्ध करण्याचा संकल्प करा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले. अॅग्रोव्हिजन व विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शंकरनगर येथील श्री साई सभागृहात आयोजित अॅग्रोव्हिजन सेंद्रीय शेती कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी खासदार दत्ता मेघे तर प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधीर पारवे, जि.प.अध्यक्ष निशा सावरकर, अभिनेता मनोज जोशी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे, संजय नहार, भारत देसरडा, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे सचिव गिरीश गांधी आदी उपस्थित होते.नैसर्गिक संकटात शेतक ऱ्यांनी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. अशा संकटावर मात करण्यासाठी जलसंवर्धनाशिवाय पर्याय नाही. यात ज्या गावात सर्वाधिक पाणीटंचाई आहे, त्यांना प्राधान्य द्या, असे आवाहन गडकरी यांनी केले.पुढील पाच वर्षात जिल्ह्यातील सर्व १८०० गावात सेंद्रीय शेतीसोबतच जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३३६ गावांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीतून ५५ कोटीचा निधी उपलब्ध केला आहे. या वर्षात १०० कोटीचा निधी खर्च करून जिल्हा टंचाईमुक्त करणार असल्याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. पशुसंवर्धन, मत्स्य विभागातील योजनांच्या तुलनेत कर्मचाऱ्यांच्या वेतनावर अधिक खर्च होतो. हा प्रकार थांबला पाहिजे. ग्रामस्तरावर ७३ सक्रिय कृषी बचतगट तयार करून प्रत्येकी पाच लाखाची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली. प्रास्ताविकातून निशा सावरकर यांनी शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती करण्याचे आवाहन केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन जि.प.चे माजी अध्यक्ष रमेश मानकर यांनी तर आभार दिलीप जाधव यांनी मानले. मनोहर परचुरे, अभयसिंग राजपूत व हेमंत चव्हाण आदींनी विविध चर्चासत्रात मार्गदर्शन केले. बाबासाहेब बोंदरे, रवी बोरटकर, साहेबराव धोटे आदीसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जलसंवर्धनातून समृद्धीकडे वाटचाल करा
By admin | Updated: April 19, 2015 02:22 IST