एका युवकाचा करुण अंत - दोन गंभीर जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरधाव मोटरसायकल अनियंत्रित होऊन समोरच्या ट्रकवर आदळली. त्यामुळे मोटरसायकलस्वार युवकाचा करुण अंत झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. संकेत महेश वैद्य (वय १८) असे मृताचे नाव आहे.
संकेत तसेच भूपेश गणवीर (वय १८) आणि शैलेश चंदनबरवे (वय १७) हे तिघे टाकळघाटच्या गंगापूर झोपडपट्टीतील रहिवासी होत. शैलेश ११ वीला तर संकेत आणि भूपेश १२ वीला शिकायचे. या तिघांमध्ये घट्ट मैत्री होती. शुक्रवारी सकाळी ते फिरण्यासाठी पारडीकडून भंडाऱ्याकडे मोटरसायकलने जात होते. आऊटर रिंग रोडने वेगात मोटरसायकलने जात असताना सकाळी ९.३० ते १० च्या सुमारास त्यांची मोटरसायकल एमएच ४० - एव्ही ०३०४ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. त्यामुळे ते तिघेही गंभीर जखमी झाले. बराच वेळ त्यांना वैद्यकीय मदत मिळाली नाही. नंतर त्यांना मेडिकलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी संकेतला मृत घोषित केले. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर गावातील अनेकांनी मेडिकलकडे धाव घेतली. अश्विनी सुनील वैद्य (वय २३, रा. बिडगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अपघातानंतर तो पळून गेला. त्याचा शोध घेतला जात आहे.
---
गावात शोककळा
या अपघाताचे वृत्त कळाल्यापासून गावात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमी भूपेश आणि शैलेशवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
----