नागपूर : आई म्हणजे प्रेम, माया, वात्सल्याचा सागर आहे. आईच्या उपकारांची महती अपार आहे. तिला हृदयाला प्रेमळ साद घालण्यासाठी लोकमत सखी मंच आणि कलाकृती साडीज् यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमाननगर येथील विमा रुग्णालयाजवळील संत रविदास सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेविका नयना झाडे, कलाकृती साडीज्चे संचालक सुरेश चौधरी, संत रविदास सभागृहाच्या संचालिका शालिनी अनिल मानापुरे यांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात पौराणिक आणि ऐतिहासिक मातांची वेशभूषा, आईवर स्वलिखीत कविता आणि माझी आई या विषयावर मनोगत अशा तीन स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्वच स्पर्धांंमधून आईला हृदयातून प्रेमळ साद घालण्यात आली. काहींनी तिच्या पदराखाली वाटणारी सुरक्षितता, ममता, माया आणि खरा आपलेपणाचा चिरंतन ओलावा, अनेक समस्यांवरचा एकच उपाय म्हणजे आई, असे संबोधले तर काहींनी मुलांना जिवापाड जपणारी, सुखदु:खांत पाठीशी उभी असलेली, आपल्या श्वासात वास करणारी, दूर असली तरी मुलांच्याच काळजीत असलेली आई सादर केली. आई विषयी मनोगत व्यक्त करणार्या स्पर्धेत तर अनेकांचे डोळे पाणावले होते. यात नुकतीच देवाघरी गेलेली आई, बाप दारू पिऊन लोळत असताना कुटुंब सांभाळणारी आई, अडाणी आईची उच्च शिक्षित मुलं, आईच बाप होते, असे एकाहून एक किस्से व्यासपीठावर सादर होत असताना, आईवरचे प्रेम व्यक्त करणासाठी एक दिवस पुरेसा नाही, असे सहज वाटून गेले. पौराणिक आणि ऐतिहासिक मातांची वेशभूषा स्पर्धेत काहींनी राणी दुर्गावती, यशोदा, जिजाऊ, मदर टेरेसा, सावित्रीबाई फुले, हनुमानाची आई अंजनी आदींची वेशभूषा करून त्यांची भूमिका सादर केल्या. या स्पर्धेतून कितीही आधुनिकीकरण झाले, तरी जगात आईची प्रतिमा कधी बदलणारी नाही, हे दिसून आले. यातच बुगीवुगी विनर्स खुशाली इंगळे, इंडिया गॉट टँलेटमध्ये धडक मारलेली मुग्धा देशकर, श्रद्धा भोयर आणि पौर्णिमा राऊत यांनी सादर केलेल्या नृत्याने कार्यक्रमाला एका उंचीवर नेऊन ठेवले. या तिन्ही स्पर्धेचे परीक्षण नाट्य आणि नृत्य विषारद वंदना माटे, दिग्दर्शिका व लेखिका शुभांगी पोहरे आणि कवी डॉ. दिलीप अर्जुने यांनी केले. प्रास्ताविक सखी मंच विभाग प्रतिनिधी रोशन शेगावकर यांनी तर संचालन सखी मंच संयोजिका नेहा जोशी यांनी केले. कार्यक्रमाला विभाग प्रतिनिधी त्रिवेणी कायंदे, अरुणा शेंडे आणि मंगेश चरडे आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
आई म्हणजे मायेचा सागर
By admin | Updated: May 16, 2014 00:48 IST